लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सोशल मीडिया हा राक्षस असल्याचा प्रत्यय दंगल, तणावाच्या परिस्थितीत येतो. मात्र त्याचा वापर कसा करतात यावर सर्व काही अवलंबून असते. आ. कृ. वाघमारे प्रशालेचा माजी विद्यार्थी हृदयविकाराच्या धक्क्याने मरण पावला. वर्गमित्रांनी मैत्री दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबाला काही आर्थिक हातभार लावण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावरून इतर वर्गमित्रांना आवाहन केले. याचा परिणाम देश-परदेशातून अनेकांनी हातभार लावून एका कुटुंबाला लाखमोलाची आर्थिक मदत करून आदर्श निर्माण केला .शहरातील आ. कृ. वाघमारे प्रशालेत १९९७ साली दहावीत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ‘मित्र-मैत्रिणी’ हा व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केलेला आहे. या माध्यमातून शाळकरी मित्र सर्वांची ख्याली-खुशाली जाणून घेतात. प्रत्येकांच्या सुख, दु:खात सहभागी होतात. या बॅचमधील एक दिवाण देवडी भागातील रहिवासी प्रशांत वैष्णव यांचे सहा महिन्यांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले. ते मुलांची खानावळ चालवायचे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार होता. निधनानंतरही कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन खानावळ हेच आहे. काम केल्याशिवाय त्या कुटुंबातील महिला सदस्यांना पर्यायच नाही. या घटनेची माहिती याच बॅचचे विद्यार्थी नवल नागोरी यांना मिळाली. त्यांनी वैष्णव यांच्या कुटुंबाला काहीतरी आर्थिक मदत करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने फे्रंडशिप डे साजरा करण्याची कल्पना मांडली. या कल्पनेला जयसिंग चव्हाण यांनी उचलून धरले. या बॅचच्या देश, परदेशात पसरलेल्या सहकाऱ्यांना माहिती देऊन थोडीफार मदत करण्याचे आवाहन केले. काही वेळातच अमेरिका, ब्रिटनसह गुजरात, मुंबई, पुणे येथे कार्यरत मित्रांनी एका बँक खात्यात काही रक्कम जमा केली. यातून एक लाख पाच हजार रुपये जमा झाले. लक्ष्मीकांत कोलते, पराग जैन, प्रसाद ठाकूर, श्रीप्रसाद कुलकर्णी, चित्रा त्रिभुवन, प्रज्ञा त्रिवेदी आदींनी हातभार लावला. जमा झालेली ही रक्कम काही मित्रांनी प्रशांत वैष्णव यांच्या पत्नी, मुलगी आणि आईकडे सुपूर्द केली. सोशल मीडियाचा मदतीसाठी वापर करणाºया वर्गमित्रांचे देवाण देवडी भागात कौतुक होत आहे.प्रशांत वैष्णव यांच्या एकुलत्या एक मुलीच्या शिक्षणासाठी ही आर्थिक मदत करण्यात आली. मुलीच्या शिक्षणासाठी हे पैसे कामी यावेत, यासाठी बँकेतच तिच्या नावे ठेवण्याचे ठरले होते. मात्र मुलीचे बँक खाते नसल्यामुळे रक्कम कुटुंबाकडे दिली. तसेच आगामी काळातही काही मदत लागल्यास नि:संकोचपणे सांगावे, अशी विनंतीही कुटुंबियांना करण्यात आली, असे लक्ष्मीकांत कोलते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
खानावळचालक मित्राच्या कुटुंबाला लाखमोलाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:18 IST