औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळ काढून टाकण्यासंदर्भात दाखल याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती व्ही. एल. आंचलिया यांच्यासमोर आज सुनावणीसाठी आली असता या याचिकेची पुढील सुनावणी १ आॅगस्ट रोजी ठेवली.शहरातील ४१ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासाठी औरंगाबाद खंडपीठाने महानगरपालिकेला ३१ मेपर्यंत मुदत दिली होती. याविषयीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर मनपाने अतिक्रमणे काढण्यासंदर्भात कार्यवाही केल्याचे मनपातर्फे अॅड. राजेंद्र सूर्यवंशी यांनी आज न्यायालयास सांगितले. आतापर्यंत १२ धार्मिक स्थळे काढून टाकण्यात आली आहेत. तर १४ स्थळांसंदर्भात संबंधितांनी मनपाकडे पी. आर. कार्ड तसेच अन्य कागदपत्रे सादर केलेली आहेत. शिवाय अतिक्रमणे काढण्याच्या खंडपीठाच्या निर्णयाविरोधात काही लोकांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अर्जात तथ्य न आढळल्याचा मुद्दा उपस्थित केल्याने संबंधितांना याचिका काढून घ्याव्या लागल्याचे खंडपीठासमोर नमूद केले. त्यावेळी न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १ आॅगस्ट रोजी ठेवली.
अनधिकृत धार्मिक स्थळ हटाव प्रकरणाची सुनावणी १ आॅगस्ट रोजी
By admin | Updated: July 24, 2014 00:38 IST