नळदुर्ग : एका ४० वर्षीय इसमाचा खून करून त्याचे प्रेत आरळी-चिवरी मार्गावरील चिलीमखडा पाझर तलावाच्या परिसरात फेकून दिल्याची घटना शनिवारी सकाळी समोर आली़ या घटनेने एकच खळबळ उडाली असून, शोध मोहिमेसाठी सायंकाळी उशिरा बीड येथून श्वान मागविण्यात आले आहे़ लोहारा तालुक्यातील जेवळी मार्गावर माळेगाव येथील व्यंकट दिगंबर एकंबे (वय-४५) या इसमाचा खून करून प्रेत खड्ड्यात टाकून दिल्याची घटना शुक्रवारी समोर आली होती़ या घटनेला २४ तास लोटण्यापूर्वीच तुळजापूर तालुक्यातील चिवरी नजीक असलेल्या चिलीमखडा पाझर तलावाच्या परिसरात शनिवारी काही गुराखी जनावरे घेवून गेली होती़ त्यावेळी त्यांना एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला़ गुराख्यांनी ही माहिती नळदुर्ग पोलिसांना दिली़ माहिती मिळताच घटनास्थळी सपोनि एम़वाय़डांगे, फौजदार पठाण यांच्यासह बजरंग सरफाळे, नागेश वाघमोडे, मोहिते आदी कर्मचाऱ्यांनी धाव घेतली़ मृतदेहाची पाहणी करून चौकशी केली असता तो इसम अनोळखी असल्याचे दिसून आले़ त्याच्या कपाळावर शस्त्राने वार केल्याचे दिसत असून, एक कानही तुटला आहे़ पोलिसांनी चौकशीची सूत्रे हलविली असून, सायंकाळी उशिरा बीड येथील श्वान पथकाला पाचरण करण्यात आले होते़ सदरील मृतदेह शुक्रवारी रात्रीच्या सुमारास साठवण तलाव परिसरात टाकून दिल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे़ इसमाच्या वर्णनाची माहिती इतर पोलीस ठाण्यांना देण्यात येत असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ (वार्ताहर)
इसमाचा खून करून प्रेत तलाव परिसरात फेकले
By admin | Updated: January 18, 2015 00:28 IST