औरंगाबाद : पावसाचे पाणी पिऊन तहान भागविण्याचा अनोखा प्रयोग गारखेड्यातील श्रीकांत शहा हे गेल्या वर्षभरापासून करीत आहेत. चार जणांच्या कुटुंबियांना वर्षभर पुरेल इतके पावसाचे पाणी साठविण्याचा संकल्प त्यांनी केला असून, त्यासाठी छतावर दहा हजार लिटर क्षमतेच्या पाच टाक्याही त्यांनी बसविल्या आहेत. पावसाचे पाणी पिण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचेही त्यांनी प्रयोगशाळांमधील चाचण्यातून दाखवून दिले आहे. गारखेड्यातील कडा कार्यालयाजवळ शहा यांचे निवासस्थान आहे. जैन मुनी आचार्य उग्रदित्यचार्य यांनी नवव्या शतकात लिहिलेला ‘कल्याणकारकम’ हा ग्रंथ त्यांच्या वाचनात आला. पावसाचे पाणी योग्य पद्धतीने साठवून त्याचा पिण्यासाठी वापर केल्यास ते अमृतासमान असल्याचा उल्लेख या ग्रंथात करण्यात आला आहे. हा ग्रंथ वाचल्यानंतर शहा यांचा पावसाच्या पाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. गेल्या वर्षी साठविलेल्या दोन हजार लिटर पाण्याचा ते अजूनही वापर करीत आहेत. शिळे न होणारे पाणी माती व सूर्यकिरणांचा संपर्क होऊ न देता छतावर पडणारे पावसाचे पाणी योग्य पद्धतीने साठवून त्याचा पिण्यासाठी नियमित वापर करता येतो. विशेष म्हणजे हे पाणी कधीच शिळे होत नाही, तसेच त्याला वासदेखील येत नसल्याचे शहा यांचे म्हणणे आहे. औद्योगिक वसाहतीच्या परिसरात पडणारे पावसाचे पाणी मात्र, आरोग्यास हानी पोहोचवू शकते. त्यामुळे ते जमा करू नये, असा सल्लाही ते देतात.
‘ते’ पितात पावसाचे आरोग्यदायी पाणी...
By admin | Updated: June 14, 2016 00:09 IST