हदगाव : तालुक्यातील गायतोंड, जगापूर, मनाठा, उमरी, गारगव्हाण, साप्ती आदी गावांतील शेकडो गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शुक्रवारी तहसील कार्यालयात ३ तास शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले़ नायब तहसीलदारांना घेराव घालून बेजार केले़तलाठी व कृषी सहाय्यकाने नेहमीप्रमाणे धनदांडगे शेतकरी व कार्यकर्त्यांची गावे निवडली़ सक्षम कार्यकर्ता अथवा नेता नसलेली गावे सोडून दिली़ यामुळे गरजू लोकांना नुकसान होवूनही रुपया मिळाला नाही़ वर्तमानपत्रात या गावाला एवढा, त्या गावाला तेवढा निधी मिळाल्याच्या बातम्या या शेतकऱ्यांना बघायला मिळाल्या़ महसूल विभागाकडून त६सीलदार येताच सर्व्हेक्षण करण्यात येईल असे लेखी आश्वासन नायब तहसीलदारांनी दिल्यानंतर हा जत्था मार्गस्थ झाला़ यामुळे तहसील कार्यालयाला बाजाराचे स्वरूप आले होते़ हा मोर्चा नंतर कृषी विभागाकडे वळला़ कृषी अधिकारी डी़आय़ तपासकर यांनाही निवेदन देण्यात आले़ यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष मुकेश सारडा, भगवान देशमुख, गायतोंडचे सरपंच शाहीर टारपे, उपसरपंच राजीव वाठोरे, पतंगे मामा, भगवान सोनाळे, कांतराव सोनाळे, हिरामन सोनाळे, कांताबाई वाठोरे, उज्ज्वला कांबळे, शांताबाई सोनाळे, बालाजी सोनाळे, अंबादास सोनाळे आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)मार्च, एप्रिल, मे, जूनमध्ये गायतोंड, जगापूर, साप्ती, गारगव्हाण, पळसा आदी गावातील शेतकऱ्यांनी पाहणी करण्यासाठी निवेदन दिले़ परंतु त्याची दखल महसूल विभागाने घेतली नाही़त्यामुळे शुक्रवार ११ जुलै रोजी मनसेचे तालुकाप्रमुख सुरेश सारडा यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर हे शेतकरी चौकशीसाठी गेले़ परंतु तहसीलदार संतोष गोरड नांदेडला बैठकीला गेल्याचे कळाल्याने संतप्त शेतकरी त्यांच्या कार्यालयात तीन तास ठाण मांडून बसले़ यामुळे नायब तहसीलदार पी़डब्ल्यू़ कांबळे यांना महिला वर्गाने घेराव घालून आमच्या येथे गारपीट होवूनही सर्व्हेक्षण का केले नाही, शासनाचे अनुदान आम्हाला का मिळत नाही असे प्रश्न विचारून त्यांना घाम फोडला़
गारपीटग्रस्त शेकडोंना ठेंगा
By admin | Updated: July 18, 2014 01:51 IST