उस्मानाबाद : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, बुधवारी कळंब तालुक्यातील कोथळा, शिराढोण, तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी, केमवाडी, माळुंब्रा आदी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात अनेक ठिकाणचे पत्रे उडून गेले. उस्मानाबाद तालुक्यातील पळसप, केमवाडी भागात काही काळ गाराही पडल्या. मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी कळंब तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. बुधवारीही जिल्ह्याच्या बहुतांश भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. यामुळे उकाडा प्रचंड वाढला होता. दुपारी चारच्या सुमारास काही भागात पावसास सुरूवात झाल्यानंतर वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला. बुधवारी कळंब तालुक्यातील शिराढोण, कोथळा, मस्सा (खं) आदी भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कोथळा जि. प. शाळेतील ग्रंथालय, स्टोअररूमवरील पत्रे उडून गेले. यावेळी विजेच्या दोन तारा तुटून शाळेच्या पत्र्यावर कोसळल्या. सुदैवाने शाळा सुटल्यानंतर ही घटना घडल्यामुळे विद्यार्थ्यांना कुठलीही ईजा पोहोंचली नाही. तसेच सुभाष डोंगरे, सर्जेराव डोंगरे आदी ग्रामस्थांच्या घरावरील पत्रेही उडून गेले. काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. मस्सा (खं) येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला. भूम तालुक्यातही अनेक भागात ढगाळ वातावरण असून, रात्री आठच्या सुमारास पाथरूड परिसरात पावसास सुरूवात झाली. याच वेळी पखरूड शिवारातही पावसास सुरूवात झाली. तामलवाडी भागातही बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह सुमारे तासभर जोराचा पाऊस झाला. या वादळामुळे माळुंब्रा शिवारातील स्वराज ढाब्याचे मोठे नुकसान झाले. तसेच एका खोलीवरील पत्रेही उडून गेले. सांगवी मार्डी, सिंदफळ भागातही जराचा पाऊस झाला असून, पिंपळा (खुर्द) गावालगतचा ओढा, तसेच पिंपळा (बु), सांगवी (काटी), सावरगाव, पांगरधरवाडी, माळुंब्रा या भागातील नालेही भरून वाहू लागले आहेत. या वादळामुळे सांगवी, माळुंब्रा शिवारात विजेचे आठ खांबही उन्मळून पडले. तसेच केमवाडी येथे काही काळ गारांचा पाऊस झाला. अवकाळी पावसाने येथेही अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, या भागातील वीज पुरवठाही खंडित झाला होता. तुळजापूर तालुक्यातल अणदूर व परिसरातही रात्री आठ वाजेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरींना सुरूवात झाली होती. (प्रतिनिधी) उस्मानाबाद तालुक्यातील कोंबडवाडी शिवारात देखील बुधवारी सुमारे दीड तास पाऊस झाला. यात जवळपास तीस हेक्टरवरील आंब्याचे नुकसान झाले. तसेच संपत जाधव यांचा गोठा वाऱ्याने उद्ध्वस्त झाला असून, बाभळीची काही झाडेही बुडापासून उन्मळून पडली. काही शेतकऱ्यांचा कडबा वाहून गेला. या पावसामुळे शिवारातून जाणाऱ्या नदीलाही चांगलेच पाणी आले होते. हे पाणी वाकरवाडी तलावात गेले. सुदैवाने या पावसामुळे कुठलीही जिवीत हानी झाली नाही. वादळी पावसात पशुधन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली. ४तेर : उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथे बुधवारी सायंकाळीजवळपास अर्धा तास गारांच्या पावसाने झोडपले. यावेळी चारा छावणीतील जनावरांचे मोठे हाल झाले. गारांचा मार लागल्याने अनेक जनावरे जखमी झाली. तसेच दयानंद नरवडे यांच्या रोपवाटीकेतील मिरची, टोमॅटो, वांगी, कोबी आदींची सुमारे दोन लाख रोपांचे या गारांच्या पावसामुळे नुकसान झाले. या पावसामुळे परिसरात पाणीच पाणी झाले होते.
केमवाडी, पळसप परिसरात गारा
By admin | Updated: April 7, 2016 00:23 IST