औरंगाबाद : मराठवाड्यातील ७६ पैकी १७ तालुक्यांतील १८४ गावांना गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. यात २० हजार ५३८ हेक्टरवरील फळपिकांसह जिरायती क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज विभागीय महसूल प्रशासनाने वर्तविला आहे.
तीन दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पावसाची हजेरी सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एका व्यक्तीचा मृत्यू, तर परभणीतील एक जखमी झाला आहे. तसेच औरंगाबादमधील ५ तालुक्यांतील ३२ गावे, जालन्यातील ७९ गावे, परभणीतील ९ गावे, बीडमधील सर्वाधिक ६२ गावे, उस्मानाबादमधील २ गावांत गारपिटीने नुकसान केले आहे. ५ हजार ४५० जिरायती, तर १० हजार हेक्टर बागायती क्षेत्र गारपिटीने उद्ध्वस्त केले आहे. ५ हजार ८५ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील २२१ लहान, तर ६ मोठी जनावरे दगावली आहेत. जालन्यात १२, औरंगाबादमध्ये ३, हिंगोलीत २, तर नांदेड व उस्मानाबादमध्ये प्रत्येकी २ मोठी जनावरे दगावली आहेत.