औरंगाबाद : गुटख्यामुळे तरुणाई बरबाद होत आहे, म्हणून राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी गुटख्यावर बंदी घातली. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात आजही राजरोसपणे गुटखा विकला जात आहे. गुटखा व्यवसायाची पाळेमुळे खोलपर्यंत रुजलेली असल्यामुळे कितीही कारवाया केल्या तरी काहीच फरक पडत नाही. शहरात दरमहा किमान पाच कोटी रुपयांचा गुटखा येतो आणि विक्री होतो. यातील ७० टक्के गुटखा हा हा बोगस होममेड कंपन्यांनी तयार केलेला असतो, हे विशेष.
गुटख्यात दोन प्रकार मोडतात. पहिला प्रकार म्हणजे ओरिजनल गुटखा. ज्याला बाजारात सर्वाधिक मागणी आहे. दुसरा प्रकार म्हणजे मिक्स होय. यामध्ये साधी सुपारी आणि तंबाखू वेगवेगळ्या पाऊचमध्ये विकला जाते. शहरातील प्रत्येक छोट्या-मोठ्या टपरीसह किराणा दुकानावर राजरोसपणे हा गुटखा उपलब्ध आहे. कायदा, राज्य शासनाची बंदी झुगारून विक्री सुरू आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात आपला आवाज अधिक बुलंद केला तरीही काहीच उपयोग झाला नाही. शहरातील ७० टक्के तरुणाई या गुटख्याच्या आहारी गेलेली आहे. कॅन्सरसारख्या अत्यंत दुर्धर आजाराला आमंत्रण देणारा हा गुटखा शहरात येतो कसा, हे पाहणे अधिक मजेशीर आहे.
रात्री बारा ते पहाटे पाचपर्यंत येतात गाड्या
शहरात कोट्यवधी रुपयांचा गुटखा तयार होत नाही. हा सर्व गुटखा वेगवेगळ्या जिल्ह्यांतून औरंगाबाद शहरात दाखल होतो. मध्यरात्री बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत खाजगी वाहनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गुटखा आणण्यात येतो. शहरातील संबंधित गोडाऊनमध्ये गाडी रिकामी केल्यानंतर ती गाडी पहाटेच शहर सोडते.
शहरात पंचवीसपेक्षा अधिक गोडाऊन
राज्य शासनाने बंदी घातल्यानंतर गुटका किंगची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कमी गुंतवणूक आणि चारपट पैसा असल्याने अनेक जण या व्यवसायात उतरले आहेत. शहरात गुटख्याचे किमान २५ पेक्षा अधिक गोडाऊन आहेत. कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत किती गोडाऊन आहेत हे पोलिसांनाही माहीत आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी पदभार घेतल्यानंतर पोलिसांनी गुटखा पकडण्याचा धडाका लावला आहे.
जिन्सी, सिटी चौक वाळूज हद्दीत सर्वाधिक गोदामे
शहरात सिटी चौक आणि जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक गोडाऊन आहेत. पोलिसांनी यापूर्वी आणि एकदा कारवाया सुद्धा केल्या आहेत. मात्र, गोडाऊन बंद झालेले नाहीत. काही व्यापारी वाळूज येथे माल उतरवून घेतात. नंतर सोयीनुसार हळूहळू हा माल शहरात येतो.