तुळजापूर : आई राजा उदो उदोच्या गजरात मंगळवारी सकाळी गुढीचे पूजन करून श्री तुळजाभवानी मंदिरात शिखरावर गुढी उभारण्यात आली. यानंतर देवीच्या नित्योपचार पंचामृत अभिषेकास प्रारंभ झाला.मंगळवारी गुढीपाडव्यानिमित्त पहाटे चार वाजता श्री तुळजाभवानी नित्योपचार चरणतीर्थ विधी पार पडला. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने सकाळी महंत तुकोजीबाबा, भोपी पुजारी शशिकांत पाटील, धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, किशोर साठे, पुजारी अतुल मलबा यांनी गुढीचे पूजन करून आरती केली व देवीच्या जयघोषात शिखरावर गुढी उभा केली. त्यानंतर नित्योपचार अभिषेक पूजेस प्रारंभ झाला. गुढीपाडव्यानिमित्त तहसीलच्या वतीने तहसीलदार दिनेश झांपले यांनी देवीस सिंहासन घालून पूजन केले. यावेळी तलाठी पवार, कर्मचारी जीवन आदी उपस्थित होते. अभिषेक पूजेनंतर धुपारती, अंगारा व सणानिमित्त मानांचा पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर तुळजाभवानीस शिवकालीन विविध दागिने घालून महाअलंकार पूजा करण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त देवीस डब्बा क्रमांक एकमधील विशेष दागिन्यांचे अलंकार घालण्यात आले होते. या पुजेचे हजारो देवी भाविकांनी आई राजा उदो उदोचा गजर करीत देवीचे दर्शन घेतले. गुढीपाडव्यानिमित्त संस्कार भारतीतर्फे मंदिरात सर्वत्र रंगीबेरंगी रांगोळी काढून भाविकांना नूतन मराठी वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. संस्कार भारतीच्या रांगोळी रेखाटनची अनेक भाविकांनी विशेषत: महिला भाविकांनी पाहणी केली व संस्कार भारतीच्या रांगोळीचे कौतुक केले. मंगळवार दिवस व गुढीपाडवा सण यामुळे अनेक भाविकांनी साखरेचे हाल घेऊन देवी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. (वार्ताहर)
तुळजाभवानी मंदिरात उभारली गुढी..!
By admin | Updated: March 29, 2017 00:14 IST