हरी मोकाशे लातूरशासनाने तुरीसाठी हमीभाव केला असला, तरी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दर देऊन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे़ लातूरच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी तुरीस कमाल भाव ५ हजार २१ रुपये मिळाला़ दरम्यान, जिल्हा उपनिबंधकांनी सर्वच बाजार समित्यांना ४० ई प्रमाणे नोटिसा बजावल्या़ परंतु, या नोटिसांनाच झुगारण्यात आल्या आहेत़ जिल्ह्यात यंदा चांगले पर्जन्यमान झाल्याने सोयाबीन, उडीद, तूर आदी शेतमालाचे चांगले उत्पन्न मिळाले आहे़ सध्या तुरीच्या राशी सुरु आहेत़ त्यामुळे ज्यांच्या राशी झाल्या ते शेतकरी सध्या बाजार समितीत तूर विक्रीसाठी आणत आहेत़ परिणामी, बाजार समितीत तुरीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे़ लातूरच्या बाजार समितीत शेतमालास चांगला दर मिळतो, हा अनुभव अनेक शेतकऱ्यांनी घेतल्याने जिल्ह्याबरोबरच परिसरातील उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील काही शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात़ लातूरच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत परवानाधारक आडते दीड हजार असून त्यापैकी ५५० व्यवहार करतात़ तसेच ६५० पैकी जवळपास २०० खरेदीदार शेतमालाची खरेदी करतात़ तुरीची आवक वाढल्याने दर कोसळले आहेत़ परिणामी, शासनाने जाहीर केलेल्या ५ हजार ५० रुपयांपेक्षाही कमी दराने तुरीचा सौदा होत आहे़ होणारी ही लूट पाहून काही शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारी केल्याने दोन आठवड्यांपूर्वी जिल्हा उपनिबंधक बी़एल़ वांगे यांनी जिल्ह्यातील अकराही बाजार समित्यांना ४० ई प्रमाणे नोटिसा बजावून हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करु नये, असे बजावले होते़ परंतु, या नोटिसांकडे बाजार समित्यांनी दुर्लक्ष केले आहे़
हमीभावाच्या आदेशाला ‘तुरी’!
By admin | Updated: January 23, 2017 23:32 IST