औरंगाबाद : येणार येणार म्हणून गाजत असलेली रेशनची चना डाळ अद्यापही औरंगाबादेत पोहोचलेली नाही. ती येथे उपलब्ध झाल्यास १९९ रेशन दुकानांवर ७० रुपये किलो या दराने विकली जाणार आहे. खुल्या बाजारातील भाववाढीला आळा घालण्यासाठी रेशनवर ही डाळ उपलब्ध करून दिली जाणार आहे. पण कुठे तरी नियोजन चुकले असावे आणि फार पूर्वीच उपलब्ध करून द्यावयाची ही डाळ अद्याप रेशनवर उपलब्ध करून देण्यात पुरवठा खात्याला यश आलेले नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत या डाळीची प्रतीक्षा करण्याशिवाय सर्वसामान्य व गोरगरिबांच्या हातात काहीही राहिलेले नाही. राज्याचे पुरवठामंत्री गिरीश बापट मात्र याबाबतीत कुठेही अधिकृतपणे माहिती देताना दिसत नाहीत. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम म्हणाले की, चना डाळ उद्या येईल. ज्या महिन्याचा माल त्या महिन्यालाच विकावा, असा नियम असल्यामुळे ऐन सणात हा माल विकता येत नसल्याने पुरवठा खात्याने एक दिवसाचा फरक बाजूला सारून हा माल विकण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रेशन दुकानदारांचे नेते डी. एन. पाटील यांनी केली आहे.
रेशनची चना डाळ अद्यापही पोहोचलीच नाही
By admin | Updated: October 29, 2016 00:52 IST