औरंगाबाद : ‘आरटीई’नुसार प्रवेश देतानादेखील काही खासगी शाळा पालकांकडून अतिरिक्त शुल्काची मागणी करीत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी सत्यता पडताळणीसाठी विविध नऊ पथके नेमली असून, सोमवारपासून शहरातील शाळांची तपासणी मोहीम सुरू केली. आज पहिल्या दिवशी पथकांनी बारा शाळांची तपासणी केली. त्यामध्ये चाटे स्कूल आणि भास्कराचार्य शाळेमध्ये शुल्क मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सदरील शाळांची मान्यता रद्द का करण्यात येऊ नये, या आशयाची नोटीस संबंधित शाळांना शिक्षण विभागातर्फेबजावण्यात येणार आहे.यासंदर्भात शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी सांगितले की ‘आरटीई’नुसार २५ टक्के प्रवेशाबाबतच्या नियमाचे पालन करण्याच्या सूचना जिल्ह्यांतील शाळांना दिल्या होत्या. त्यानुसार ‘आॅनलाईन’ नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. तरीदेखील काही शाळांनी नियमाचे पालन केले नसल्याच्या काही तक्र ारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची खातरजमा करण्यासाठी आम्ही आज तपासणी केली. मी स्वत: चाटे स्कूल व भास्कराचार्य शाळेचे रेकॉर्ड तपासले. तीन पालकांनी माझ्याकडे लेखी तक्र ार दिली होती. ‘आरटीई’नुसार प्रवेश देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारता येत नाही; पण चाटे स्कूलमध्ये फी मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यासंदर्भात शाळा व्यवस्थापनास नोटीस बजावण्यात येणार आहे. ‘आरटीई’ कायद्यानुसार अशा शाळांची मान्यताही रद्द होऊ शकते.
शाळांची झाडाझडती
By admin | Updated: May 12, 2015 00:55 IST