लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर जरी केले असले, तरी ही आकडेवारी फसवी वाटू नये, यासाठी प्रत्येक जिल्हानिहाय शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याची यादी शासनाने प्रकाशित केली पाहिजे. तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याचे मोजून घेणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले. कर्जमाफीला फॅशन समजणाऱ्या, शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणून त्यांची हेटाळणी करणाऱ्यांना शिवसेनेने झुकविल्याचे म्हणत ठाकरे यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांना टीकेचे लक्ष्य बनविले.समृद्धी महामार्गाविरोधात शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ते औरंगाबादेत आले होते. तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत कर्जमाफीवर अभ्यासगट स्थापन करून जून २०१७ पर्यंत कर्जमाफीची मागणी त्यांनी केली. कर्जमाफीच्या जाहिरातींमधून शिवसेनेला डावलले. भाजपने श्रेय लाटण्यात आघाडी घेतली. यावर ठाकरे म्हणाले, भाजपला सांगावे लागते, आम्हाला सांगावे लागत नाही. मी सरकारवर आरोप करीत नाहीये. सरकारने जी आकडेवारी दिली आहे, त्यामध्ये कुणाचीही फसगत होऊ नये, ही अपेक्षा आहे. जून २०१६ नंतरच्या कर्जाचे नवीनीकरण शेतकऱ्यांनी करून घेतले आहे. जवळपास ६० टक्के कर्ज जुन्याचे नवे झाले आहे. सरकार फक्त आकडेवारी सांगत आहे, यावर आपले मत काय आहे? ठाकरे म्हणाले, शेतकरी सुखावत असताना नोटाबंदीचा फटका त्याला बसला. रोखीचा तुटवडा झाला, जिल्हा बँकेत शेतकऱ्यांचा पैसा अडकला. बँकेत घोटाळा झाला असेल तर घोटाळेबाजांना लटकवा. बँकेच्या माध्यमातून बसलेली ग्रामीण घडी विस्कटली.
कर्जमाफीत सेनेने सरकार झुकविले
By admin | Updated: June 27, 2017 01:05 IST