लालखाँ पठाण । लोकमत न्यूज नेटवर्कगंगापूर : गंगापूर शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील जागा अपुरी पडत आहे. त्या अनुषंगाने नगर परिषद हद्दीत नव्याने प्लॉटिंगच्या व्यवसायाबरोबरच भूमाफियांनी शासकीय जागा हडपण्याचा धंदा सुरू केला आहे.गंगापूर शहरात तीन ओढे आहेत. एक ओढा गणपती मंदिर परिसर, दुसरा तुलसीबाग प्राथमिक शाळेच्या पाठीमागून डॉ. सूर्यवंशी व डॉ. वाकडे यांच्या दवाखान्यापासून गेलेला आहे तर तिसरा ओढा आंबेवाडी परिसरातून नाहदी पेट्रोल पंपाला लागून पश्चिम दिशेकडून गावातील दरगाह मार्गे तकिया व पुढे गोदावरी नदीच्या दिशेने गेला असून गावातील दोन ओढे याच ओढ्याला मिळाले आहेत. मागील वर्षी या तीन ओढ्यांपैकी तुलसीबाग प्राथमिक शाळेच्या पाठीमागून डॉ. सूर्यवंशी व डॉ.वाकडे यांच्या दवाखान्यापासून गेलेल्या ओढ्याची विक्री झाली आहे. तर गणपती मंदिराशेजारील ओढ्याची एका ‘व्हाईट कॉलर’ नेत्याने ‘साफसफाई’ केली आहे. भूमाफियांनी आता आपला मोर्चा औरंगाबाद मार्गावरील आंबेवाडी परिसरातून नाहदी पेट्रोल पंपाला लागून गेलेल्या शिव रस्त्याकडे वळविला आहे. आंबेवाडी ते गंगापूर हा पूर्वी ३३ फुटांचा पांदी रस्ता होता . सर्व्हे क्रमांक २९६ व १७ च्या सीमेवरून हा रस्ता गेलेला आहे. पूर्वी आंबेवाडीचे नागरिक याच रस्त्याचा वापर करीत होते. कालांतराने रस्त्याची पांदी झाली व पांदीची जागा नाल्याने घेतली. नगरपालिकेने हा रस्ता डीपी प्लॅनमध्ये टाकलेला आहे. असे असताना या ठिकाणी अतिक्रमण करण्याचे काम हाती घेतले आहे. पूर्वीदेखील याच रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण करून हा रस्ता हडप केला आहे. शिवाय रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतमालकांनी दर वर्षी दोन सऱ्या वाढवून रस्ता आपल्या ताब्यात घेतला आहे. जुना पांदी रस्ता हडप करण्याचा प्रयत्न होत असल्याची बाब येथील काही जागरूक नागरिकांनी नगराध्यक्षा वंदना प्रदीप पाटील यांच्या लक्षात आणून दिल्यावर पाटील यांनी हा रस्ता नगर पालिकेच्या विस्तारीकरण योजनेत असल्याचे सांगून तात्काळ मुख्याधिकाऱ्यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची सूचना केली. दिवसा बोभाटा होईल म्हणून अतिक्रमणधारकाने रात्रीच्या वेळी रस्ता जेसीबी लावून रस्ता बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. शहरात औरंगाबाद मार्गाला लागून गंगापूर पोलीस ठाण्याची वसाहत आहे. या ठिकाणी देखील भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली आहेत.
शासकीय जमिनी भूमाफियांच्या घशात
By admin | Updated: June 24, 2017 23:54 IST