लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील जिल्हा सामान्य, उपजिल्हा, ग्रामीण व स्त्री रुग्णालयांत कुटुंब नियोजन, कान, नाक, घसा, अपेंडिक्स व हाडांच्या वेगवेगळ्या ६ हजार ७७२ शस्त्रक्रीया एका वर्षात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे.परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय मराठवाड्यातील सर्वात मोठे रुग्णालय म्हणून ओळखले जाते. त्यामुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात या रुग्णालयात उपचारासाठी येतात. या रुग्णालयात येणाºया रुग्णांची संख्या कमी व्हावी, यासाठी या रुग्णालयासह गंगाखेड, सेलू येथे उपजिल्हा रुग्णालय, बोरी, जिंतूर, मानवत, पालम, पाथरी, पूर्णा येथे ग्रामीण रुग्णालयांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणारे रुग्ण या उपजिल्हा रुग्णालयात व ग्रामीण रुग्णालयात दाखल होतात. या दाखल झालेल्या काही रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले जाते. तर काही रुग्णांवर याच रुग्णालयात शस्त्रक्रियाही करण्यात येतात. मार्च २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत ६ हजार ७७२ रुग्णांवर कुटुंब नियोजन, कान, नाक, घसा, अपेंडिक्स, वेगवेगळ्या हाडांच्या व डोळ्यांच्या मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामध्ये परभणी जिल्हा रुग्णालयात २१२७, स्त्री रुग्णालयात ३६२१, गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात ४८०, सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात ६२ तर बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात ५९, जिंतूर ग्रामीण रुग्णालय २५, मानवत येथे १३२, पालम येथे २८, पाथरी येथे ५६, पूर्णा येथे १८२ अशा ६ हजार ७७२ रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
शासकीय रुग्णालयांत साडेसहा हजार शस्त्रक्रीया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:52 IST