औरंगाबाद : तब्बल ३ महिने वेतनाविना एक-एक दिवस उधारीवर ढकलत आहोत. आता आत्महत्या करून जीवन संपविण्याची वेळ कर्मचाऱ्यावर आली. तेव्हा कुठे जागे झालेल्या एसटी महामंडळाने एक महिन्याचे वेतन करण्याचा निर्णय घेतला. पण हे महिन्याचे वेतन उधारी देण्यातच जाईल. माझ्या आईचा पूर्ण पगार द्या, अशी आर्त हाक महिला एस.टी. कर्मचाऱ्याच्या मुलीने दिली.
अलिना सिद्धीकी असे या मुलीचे नाव. तिची आई साबेरा सिद्धीकी या एस.टी. महामंडळात लिपिक आहेत. एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्याचे गेल्या ३ महिन्यांचे वेतन थकले. वेतन देण्याच्या मागणीसाठी सोमवारी एस.टी. कामगारांनी राहत्या घरी कुटुंबीयांसह आक्रोश आंदोलन केले. थकीत वेतन देणे, एस.टी. महामंडळाचे शासनात विलनीकरण करणे अशा विविध मागण्यांचे फलक हाती आंदोलन केले. यावेळी महामंडळाच्या कारभाराविरोधात आक्रोश करण्यात आला.
दुकानदारापासून तोंड लपविण्याची वेळसाबेरा सिद्धीकी म्हणाल्या, घराची आर्थिक जबाबदारी माझ्यावरच आहे. पण ३ महिने पगार नसल्याने किराणा दुकानदाराची थकबाकी वाढली. त्यामुळे लपत जाण्याचीही वेळ आली. एक महिन्याचा पगार देण्याचा आज निर्णय झाला. परंतु हा पगार उधारी देण्यातच जाईल. जीवन अवघड झाले आहे.
लेकरांना दिवाळीत गोडधोड मिळू द्याएक महिन्याच्या वेतनातून बँक कर्जाचे हप्ते कापून घेईल. मग हातात किती पैसा येणार, दिवाळी कशी साजरी करायची, हा प्रश्न पडला आहे. एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण केले तरच कर्मचाऱ्यांचे हाल कमी होतील, असे कर्मचारी राजेंद्र वहाटुळे म्हणाले.