औरंगाबाद : आजही समाजात आंतरजातीय प्रेमविवाह करण्यास खुल्या मनाने मान्यता दिली जात नाही. त्यामुळे अनेक जोडप्यांना पळून जाऊन गुपचूप लग्न करावे लागते. आंतरजातीय प्रेमविवाहावर आधारित सैराट चित्रपट बॉक्स आॅफिसवर धूम करीत आहे. या चित्रपटात तरुणीचे नातेवाईक शेवटी त्या युगुलाचा खात्मा करताना दाखविण्यात आले आहे. या चित्रपटातील दृश्याप्रमाणेच शहरातील एका प्रेमविवाह केलेल्या तरुणीला तिच्या माहेरकडील मंडळींनी बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना २६ मे रोजी दुपारी गारखेडा परिसरातील विजयनगर येथे घडली.पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार अंजली (नाव बदलले आहे) ही आई-वडिलांसह तर समीर पाटील (नाव बदलले) मावशीच्या घरी एका कॉलनीत राहत असत. दोन वर्षांपासून त्यांचे प्रेम होते. त्यामुळे त्यांनी परिवाराकडे आंतरजातीय विवाहाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, मुलीच्या नातेवाईकांकडून त्यांच्या प्रेमविवाहाला विरोध होता. त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी या लग्नास नकार दिला. शेवटी महिनाभरापूर्वी अंजली आणि समीर यांनी प्रेमविवाह केला. नवविवाहित दाम्पत्य विजयनगर येथे राहू लागले. याबाबतची माहिती तिच्या माहेरच्या मंडळींना मिळाली. शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अंजली घरी एकटी असताना तिच्या माहेरचे चार जण तिच्या घरी गेले. यावेळी त्यांनी तिला तू प्रेमविवाह का केला असे विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रसंगी झालेल्या आवाजामुळे शेजारी मदतीसाठी धावत आल्याने तिची सुटका झाली. या घटनेनंतर तिने मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीला मारहाण
By admin | Updated: May 29, 2016 00:17 IST