उस्मानाबाद : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील आठही पालिकांमध्ये निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मतदानासाठी अवघ्या नऊ दिवसांचा कालावधी राहिला आहे. पालिका निवडणुकीतील उमेदवारांनी मागील काही दिवस गृहभेटीवर भर दिला होता. आता प्रचाराच्या पुढच्या टप्प्यात प्रमुख पक्षाचे दिग्गज नेते प्रचारसभा निमित्ताने जिल्ह्यात दाखल होत आहेत. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कळंब आणि नळदुर्ग येथे सभा घेणार आहेत तर भाजपाच्या प्रचारार्थ सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याही विविध ठिकाणी सभा होत आहेत. भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी ठिकठिकाणी सभा, प्रचारफेऱ्यांचे आयोजन करण्यात आो आहे. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता भूम, साडेतीन वाजता कळंब येथे बैठक तसेच प्रचारफेरी, तर सायंकाळी साडेसहा वाजता उस्मानाबाद येथील जिजाऊ चौकात त्यांची जाहीर सभा होणार आहे. १९ रोजी सकाळी साडेआठ वाजता उमरग्यात प्रचारफेरी काढून साडेअकरा वाजता नळदुर्ग येथे बैठक आणि प्रचारफेरी काढणार असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी कळविले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेही शुक्रवारी जिल्ह्यात दाखल होत आहेत. दुपारी ४.२५ वाजता ते नळदुर्ग येथे येणार असून, पाचच्या सुमारास भवानी चौकात त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर पावणेआठ वाजता त्यांचे कळंबमध्ये आगमन होणार असून, रात्री आठच्या सुमारास कळंब शहरातील बागवान चौकात ते प्रचारसभा घेणार आहेत. खा. सुप्रिया सुळे याही शहरात प्रचारासाठी येणार आहेत. काँग्रेसकडून नारायण राणे, नसीम खान यांच्या सभांची शक्यता वर्तविली जात आहे. सेनेचे काही नेते शहरात सभा घेणार आहेत. भाजपच्या पंकजा मुंडे यांची सभा होणार असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले. त्यामुळे आगामी दहा दिवसांचा कालावधी पक्ष व उमेदवारांसाठी चांगलाच धावपळीचा ठरणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उस्मानाबादेत सभा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, गुरूवारी उशिरापर्यंत त्यांचा दौरा निश्चित झालेला नव्हता. (प्रतिनिधी)
दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडणार
By admin | Updated: November 18, 2016 00:54 IST