लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यात पहिल्यांदाच जर्मन टेक्नॉलॉजीने रस्त्याचे काँक्रिटीकरण होत आहे. महानुभाव आश्रम ते लिंक रोडपर्यंतचे काम त्या टेक्नॉलॉजीच्या साह्याने सुरू झाले आहे. या रोडचे ३० टक्के काम झाले आहे. १२ कोटी रुपयांची मशीन प्रथमच औरंगाबादमध्ये रस्ते बांधणीसाठी वापरण्यात येत आहे. ३० फूट रुंद आणि ७०० मीटरपर्यंत लांबीचे काम ही मशीन एका दिवसात करते. मशीनवर साधारणत: ८ व्यक्ती काम करण्यासाठी लागतात. जर्मन टेक्नॉलॉजीने स्लिप पॉम पेवर या मशीनद्वारे काँक्रिटीकरण करण्यासाठी जर्मन आॅपरेटर मरिनो यांनी शहरात आठ दिवस त्या मशीनचे इन्स्टॉलेशन करून रोडवर चाचणी घेतली. या स्लिप पॉम पेवर मशीनने काँक्रिटीकरण केल्यानंतर त्या रस्त्याची फिनिशिंग लेव्हलही चांगल्या प्रकारे होते. महानुभाव आश्रम ते लिंक रोडपर्यंत वाहनांची खूप मोठी वर्दळ असते, त्यामुळे येणाऱ्या वाहतुकीला, नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. तासन्तास या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असे. औद्योगिक क्षेत्रातील जड वाहने व वाळूच्या चोरट्या वाहतुकीमुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याचे तातडीने काम करण्याचे आदेश दिले होते. तसेच यासाठी वेगळा निधी राखीव ठेवावा, अशाही सूचना केल्या आहेत. बांधकाम विभागाने तातडीने बिल अदा केल्यास २० जुलैपर्यंत हा रोड वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो.
पैठण लिंक रोडचे काम जर्मन टेक्नॉलॉजीने
By admin | Updated: July 3, 2017 01:05 IST