जितेंद्र डेरे
लाडसावंगी : येथील दूधना नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला तीन वर्षांपासून दरवाजे न बसविल्यामुळे पाणी साठवणूक करता आलेली नाही. बंधाऱ्याशेजारीच दरवाजे धूळ खात पडले आहेत. यामुळे परिसरातील शेतीला पाणी न मिळाल्याने नुकसान झाले आहे.
दूधना नदीच्या पात्रात लाडसावंगी शिवारात १९९२-९३ साली तीन कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. सुरुवातीला सात वर्षांपर्यंत या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याचा सिंचनासाठी फायदा झाला होता. मात्र, कालांतराने दरवाजे सडले, तर काही दरवाजे १७ सप्टेंबर २०१५ ला दूधना नदीला महापूर आल्याने काही दरवाजे वाहून गेले होते. यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी सतत मागणी केल्याने जिल्हा परिषदेने दरवाजे मंजूर करून २०१७ साली लाडसावंगी गावाजवळील कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी जवळपास नवीन शंभर दरवाजे आणून ठेवले आहेत. मात्र, हे दरवाजे तीन वर्षांपासून तसेच धूळ खात पडले आहेत.
चौकट-
बसविण्यापूर्वीच दरवाजांचे भंगार होण्याची शक्यता
बंधाऱ्याला बसविण्यापूर्वीच एकाच जागी तीन वर्षांपासून पडल्याने नवीन दरवाजांना गंज चढत आहे. यामुळे त्यांचे भंगार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दरवाजांवर प्रशासनाने केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चौकट
लाडसावंगीला पाणीटंचाईची शक्यता
लाडसावंगी येथील शेंडी महादेव मंदिर परिसरात दूधना नदी व कऱ्हाडी नदीचा संगम होतो. यात संगमावर कोल्हापुरी बंधारा असल्याने या बंधाऱ्याचे पाणी सुमारे एक किलोमीटर पात्रात साचते. यामुळे लाडसावंगी गावाला पिण्याच्या पाण्यासह शेकडो एकर जमिनीला सिंचनासाठी फायदा होतो. मात्र, तीन वर्षांपासून दरवाजे येऊनही प्रशासनाने ते न बसविल्यामुळे पाणी वाहून गेले आहे. यामुळे उन्हाळ्यात लाडसावंगीला पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोट
संबंधितांवर कारवाईची मागणी करणार
सतत पाठपुरावा केल्याने जिल्हा परिषदेकडून शंभर दरवाजांची मागणी पूर्ण झाली. मात्र, तीन वर्षांपासून दरवाजे बसविले नसल्यामुळे पाणी वाहून जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे.
- रेणुका शिंदे, जि. प. सदस्या लाडसावंगी.
फोटो : १)लाडसावंगी येथील कोल्हापुरी बंधाऱ्याला दरवाजे न बसविल्याने लाखमोलाचे पाणी असे वाहून जात आहे. २) लाडसावंगी येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे असे गंज खात पडले आहेत.