शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

Gandhi Jayanti Special : शहराची दुरवस्था मला नाही पाहवत! तुम्ही कसे पाहता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 12:09 PM

महात्मा गांधी जयंती विशेष : गांधीजींच्या तीन माकडांची मराठवाडा सैर... मी समजून घेतले नांदेड शहराचे समग्र वर्तमान आणि जाणून घेतला भूतकाळही. या शहराने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले. अनेक मंत्री आणि मोठमोठ्या राजकीय पक्षांना उभारी देणारे असंख्य नेते दिले. महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देऊ शकणारे राजकीय धुरंधर इथे असूनही या शहराची ओळख राष्ट्रीय पातळीवर का होऊ शकली नाही? आता मी म्हणजे बोलून चालून माकड. मला पडलेले प्रश्न तुम्हाला पडतीलंच असं अजिबात नाही. 

- डॉ. पी. विठ्ठल

आम्ही आम्हा तिघा भावंडांना ओळखतच असाल. होय ना?  तुमच्या दृष्टीने आम्ही म्हणजे निव्वळ एक करमणूक. अगदी संसदेपासून ते तुमच्या मुलांच्या खेळण्यापर्यंत आमचा मुक्त वावर असतो. कारण आम्ही आहोत सर्वांना प्रिय. महाकाव्ये असो की तात्पर्यकथा असो, आमच्याशिवाय त्या पूर्ण होतच नाहीत. शिवाय आम्ही तुमचे पूर्वज ही एक थोर ओळख आहेच. तो डार्विन की कोण त्याने सांगितलाच असेल ना तुम्हाला उत्क्रांतीचा सिद्धांत वगैरे! तर ते जाऊ द्या. मी आता कोणताच इतिहास, भूगोल उगाळत बसत नाहीय; पण एक सांगू? आम्हाला खरी ओळख दिली ती महात्मा गांधी यांनी. आठवताहेत ना गांधी? नाही म्हणजे आजकाल काहीच सांगता येत नाही म्हणून विचारलं.

तर असो. अहिंसा, सहिष्णुता आणि शाकाहाराचा आयुष्यभर प्रसार करणाऱ्या बापूंमुळे आम्हाला राष्ट्रीय ओळख मिळाली बरं का! आमची एक मोठी गंमत आहे. माझे हात माझ्या डोळ्यावर आहेत, तर माझ्या दोन्ही भावंडांनी त्यांचे तोंड आणि कान बंद केले आहेत. का बरं असं? हा प्रश्न पडलाच असेल तुम्हाला. आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याच्या भानगडीत मी पडत नाही.  पण अधून मधून प्रवास होतोच. डोळे उघडावेच लागतात आणि जे जे बघितलंय ते ते सांगावं वाटतं. म्हणजे तुमचे डोळे उघडावेत असं मनापासून वाटतं. 

नांदेड प्राचीन मराठवाड्यातलं एक मोठं शहर. नंदिग्रामनगरी म्हणतात या शहराला. गोदावरी आणि संतमहंतांसह गुरुगोविंदसिंहांच्या स्पर्शाने पावन झालेली ही समृद्ध भूमी. मी समजून घेतले या शहराचे समग्र वर्तमान आणि जाणून घेतला भूतकाळही. या शहराने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले. अनेक मंत्री आणि मोठमोठ्या राजकीय पक्षांना उभारी देणारे असंख्य नेते दिले. महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देऊ शकणारे राजकीय धुरंधर इथे असूनही या शहराची ओळख राष्ट्रीय पातळीवर का होऊ शकली नाही? आता मी म्हणजे बोलून चालून माकड. मला पडलेले प्रश्न तुम्हाला पडतीलंच असं अजिबात नाही. 

तर नांदेडच्या बाजूलाच असणाऱ्या तेलंगणा राज्यात कधी गेलात का?  जर गेला असाल तर तिथले रस्ते आणि नांदेड जिल्ह्यातले रस्ते यात काही फरक जाणवला की नाही?  औरंगाबाद, परभणी, नागपूरचा रस्त्याने प्रवास म्हणजे एक दिव्यच. घेतलाय ना अनुभव तुम्ही? मग हे असं का घडतं? विकासाच्या इच्छाशक्तीचा अभाव की आणखी काही. उत्तरं तुमची तुम्ही शोधा. मी फक्त माझ्या डोळ्यांना जे दिसलं ते दाखवतोय, तेही केवळ आजच. नंतर माझे डोळ्यावर हात आहेत. नांदेडचा भौतिक विकास करायचा प्रयत्न झालाच नाही असे नाही; पण आजूबाजूच्या शहरांना स्मार्ट सिटीचे स्वप्न पडत असताना तुम्ही नेमके कुठे आहात याचा विचार केलाय का? दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण नियोजनाचा अभाव हा एक मोठाच शाप आहे.

रेल्वे आणि बसस्थानकासमोरची अतिक्रमणे असो की, रस्तोरस्ती होणारी वाहतुकीची कोंडी असो. चौकाचौकात लागलेल्या होर्डिंग्जचा तुम्हाला काहीच कसा त्रास होत नाही? होळी, मोंढा, वजिराबाद, शिवाजीनगर, श्रीनगर, हिंगोली गेट, नमस्कार चौक, डॉक्टर लेन, तरोडा नाका, छत्रपती चौक, राज कॉर्नर, फुले मार्केट कुठेही जा, तुमची दमछाक होत असेल ना? आणि रात्री-अपरात्री तुम्ही खरंच भयमुक्त फिरू शकता? माझी तर तारांबळ झाली बॉ! गल्लोगल्लीत फिरणारी मोकाट डुकरे  आणि भटके कुत्रे आणि मुख्य रस्त्यावर स्थितप्रज्ञ उभी असलेली गाढवं पाहून हादरलोच मी. तुम्हाला याची सवय झालीय का? 

कधीकाळी या शहराचं सांस्कृतिक वैभव असणाऱ्या कला मंदिराकडे इथल्या साहित्यिक, विचारवंतांची नजर का नाही वळत? इथली दुरवस्था कशी बघू शकतात ते? मनपा प्रशासनालाही याचे काहीच सोयरसुतक नाही. ही खेदाचीच गोष्ट.  हिंगोली अंडरब्रिजमधून जायची भीती वाटली मला. गोदावरी नदी आणि इथले घाट तर आपलं सौंदर्य गमावून बसलेत. खरे तर गुरुद्वारासोबतच नदी आणि घाट हे पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र व्हायला हवे; पण तसे का होत नाही? आणि हो एक महत्त्वाची बाब सांगायलाच हवी. शासनाने गुटखा आणि कॅरिीबॅगवर बंदी आणलीय ना? मग नांदेड या बंदीला अपवाद कसे? उघड्या भरणाऱ्या बाजारामुळे कचऱ्याचे ढीगच ढीग दिसतात इथे. किती गोष्टींबद्दल बोलावे? जाऊ द्या. तुम्ही ठरवा काय करायचे ते? मला नाही बघवत हे. या शहराचे नागरिक म्हणून तुमचीही काही जबाबदारी आहेच ना शेवटी? फक्त एक सांगतो, आज बापूजींची जयंती आहे. किमान आजतरी आपण काही संकल्प कराल, अशी अपेक्षा आहे. चला निघतो मी. मला जे दिसलं ते सांगितलं. आता पुन्हा मी हे बघणार नाहीच!!!  

माकड असूनही गोंधळलो; तुम्ही कसे सहन करता हे सारे?नांदेड शहरातील श्यामनगर, महात्मा फुले शाळेजवळील आणि परिसरात असलेल्या कोचिंग क्लासेसबाहेरचा गोंधळ तुम्हाला कधीच दिसला नाही? गाड्यांचे कर्णकर्कश आवाज काढत बेधुंद धावणारी तरुण मुलं तुमचीच असतील ना? मी माकड असूनही गोंधळून गेलो. शहराच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या या गोष्टी तुम्ही कशा सहन करता?

(लेखक हे नांदेड विद्यापीठाच्या भाषा संकुलात प्राध्यापक, डॉ. आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख आणि नव्वदोत्तर पिढीतील महत्त्वाचे कवी आहेत.) 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीNandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका