परभणी : खरीप २०१५ मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी तहसील कार्यालयांनी नोंदविलेल्या मागणीनुसार ३० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी पाथरी व मानवत हे दोन तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील तहसीलदारांच्या खात्यावर हा निधी वर्ग केला आहे़ त्यामुळे लवकरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप सुरू होणार आहे़ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने ४०० कोटी रुपयांची मागणी नोंदविली होती़ त्यानुसार आतापर्यंत १८५ कोटी ७५ लाख रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत़ प्राप्त अनुदानापैकी बहुतांश अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे़ खरीप २०१५ च्या हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान वाटप सुरू असताना अनेक शेतकरी अनुदानाच्या लाभापासून वंचित राहिले असल्याने प्रत्येक तहसील कार्यालयाने वाढीव अनुदानाची मागणी केली होती़ त्यानुसार जिल्हाभरातून ५५ कोटी ४७ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती़ त्या तुलनेत जिल्ह्याला ३० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ तसेच पाथरी तहसील कार्यालयाने २३ मार्च रोजी ४८ लाख ९ हजार १२० रुपयांचा निधी समर्पित केला होता़ शासनाकडून प्राप्त झालेले ३० कोटी आणि पाथरी तहसील कार्यालयाने समर्पित केलेले ४८ लाख ९ हजार १२० रुपये असे ३० कोटी ४८ लाख ९ हजार १२० रुपये जिल्हा प्रशासनाने त्या त्या तहसील कार्यालयाला मागणीनुसार वर्ग केले आहेत.
तहसील खात्यावर निधी वर्ग
By admin | Updated: March 27, 2016 23:57 IST