लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पुंडलिकनगर रोडवरील एस्सार कंपनीच्या पेट्रोलपंपातही ग्राहकांना इंधन देताना मापात चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे गुन्हे शाखा, वैध मापन विभागाने केलेल्या संयुक्त तपासणीत आढळून आला. या पंपाला पोलिसांनी सील लावले. सलग तिसऱ्या दिवशी शहरातील पेट्रोलपंपावर इंधन चोरीचा प्रकार समोर येत असल्याने खळबळ उडाली आहे. पेट्रोलपंपाच्या इंधन वितरण यंत्रात इलेक्ट्रॉनिक्स कीट बसवून मापात पाप करणाऱ्या टोळीला ठाणे गुन्हे शाखा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी जेरबंद केले. या टोळीने राज्यातील विविध पेट्रोलपंपांवर अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक किटस् बसवून दिल्याची माहिती आणि या किटस् कशा काम करतात, याविषयीची माहिती पोलिसांना दिली होती. यानंतर पोलीस निरीक्षक विकास घोडके, उपनिरीक्षक अविनाश महाजन, शिवराज बेंद्रे, पोहेकॉ. अंकुश भोसले, सुरेश यादव, प्रशांत भुरके, संतोष सुर्वे यांचे पथक २२ जून रोजी शहरात दाखल झाले. पोलिसांसह वैध मापन विभाग, विविध पेट्रोलियम कंपनीचे विभागीय अधिकारी यांचे संयुक्त पथक २३ जूनपासून शहरातील पेट्रोलपंपांची तपासणी करीत आहे. २३ रोजी अदालत रोडवरील चुन्नीलाल पंपात प्रती पाच लिटरमागे १५० मिली इंधनाची चोरी या पथकाने उघडकीस आणली. तर शनिवारी २४ रोजी एपीआय कॉर्नर येथील भवानी आॅटो पंप आणि दिल्लीगेट येथील पेट्रोलपंपाची पथकाने तपासणी केली. या तपासणीत भवानी आॅटो पंपावरील पेट्रोल-डिझेल वितरित करणाऱ्या यंत्रात गडबड असल्याचे आढळून आले.
पुंडलिकनगर रोडवरील पंपातही इंधन चोरी
By admin | Updated: June 26, 2017 00:51 IST