हिंगोली : भाजपाचेनेते तथा केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे आणि हिंगोली जिल्ह्याचे ऋणानुबंध होते. युती सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असताना तसेच पक्षाचे राष्टÑीय सरचिटणीस म्हणून काम करताना प्रचारसभा, मेळावे यानिमित्ताने त्यांनी अनेकवेळा हिंगोली जिल्ह्यात भेटी दिल्या होत्या. विशेष म्हणजे १९९९ साली झालेल्या जिल्ह्याच्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान होते. हिंगोली जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ रोजी करण्यात आली. परभणी जिल्ह्यापासून हिंगोली स्वतंत्र करण्याची प्रक्रिया गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असतानाच झालेली होती. त्याआधीपासून जिल्ह्यातील शिवसेना-भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मुंडे यांचे चांगले संबंध होते. भाजपाच्या वतीने काढण्यात आलेली परिवर्तन यात्रा मुंडे विरोधी पक्षनेते असताना जिल्ह्यात आली होती. लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्राही गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली या भागात पोहोचली होती. हिंगोली जिल्हा, सेनगाव व औंढा तालुका निर्मितीत मुंडे यांचा मोठा वाटा होता. याशिवाय सेनगाव पोलीस ठाणे, मार्केट यार्डाचा प्रश्नही त्यांच्याच कार्यकाळात मार्गी लागलेला आहे. १९९५ ते १९९९ या काळात उपमुख्यमंत्री म्हणून काम करीत असताना मुंडे यांच्या प्रयत्नांमुळेच संत नामदेवांची जन्मभूमी असलेल्या नर्सी येथे पर्यटन निवासाचे काम झाले. हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर, पुरजळ, मोरवाडी, २३ गाव आदी पाणीपुरवठा योजना मुंंडे यांच्यामुळेच मार्गी लागल्या. हिंगोली जिल्ह्यात १९८० पासून भाजपाच्या कामाला सुरूवात झालेली होती. प्रारंभी बापूसाहेब करमळकर, चंपालाल गौड, रामेश्वर लदनिया, सत्यविजय अन्वेकर, दादा बंडाळे, अण्णा मेने, श्रीकांत देशपांडे, पांडुरंग पाटील, ब्रिजलाल खुराणा, विनोद परतवार, बळवंतराव देशमुख, वसंतराव पुरोहित, शंभुसिंह गहिलोत प्रा. दुर्गादास साकळे, सखाराम दादेगावकर, दिवंगत माजी खा.विलास गुंडेवार आदी मंडळींनी पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न केले. या मंडळींचे पक्षातील सर्वच नेत्यांशी चांगले संबंध असल्याने वरिष्ठ नेते हिंगोलीत येत असत. परभणी जिल्हा असल्यापासून हिंगोलीशी गोपीनाथ मुंडे यांचा संबंध होता. मागील अनेक वर्षांपासून भाजपात सक्रिय असलेले सुभाष लदनिया, तान्हाजी मुटकुळे, रामराव पतंगे, बाबाराव बांगर, सखाराम बोखारे, अॅड.प्रभाकर साकळे, अॅड. गणेश ढाले, सुरजितसिंग ठाकूर, बी. डी. बांगर, तेजकुमार झांजरी, गोवर्धन वीरकुँवर, शिवदास बोड्डेवार, विनायक महाराज, शंकर बुरूडे, कांतराव कोटकर, पुरूषोत्तम गडदे, अशोक पाटील, संतोष टेकाळे, फुलाजी सावळे, रविकुमार कान्हेड आदींशी मुंडे यांचा विशेष परिचय होता. हिंगोली येथील पीपल्स बँकेचे संस्थापक सहकारमहर्षी ओमप्रकाश देवडा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विशेष सत्कार सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी गोपीनाथ मुंडे त्यावेळी प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ.नितू मांडके यांच्यासोबत हिंगोलीत आले होते. व्यापक जनसंपर्क आणि प्रभावी वक्तृत्व ही गोपीनाथ मुंडे यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्टये होती. तसेच त्यांनी जोडलेले कार्यकर्ते अधिक महत्वाचे असल्याने ते कधीही कोणत्याही कार्यकर्त्याला नावाने हाक मारत असत. याचा प्रत्यय हिंगोली जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी घेतला आहे. हिंगोली, वसमत, कळमनुरी नगर परिषदांच्या निवडणूक प्रचारासाठी गोपीनाथ मुंडे यांची हिंगोलीत जाहीर सभा झाली होती. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी संतोष बांंगर, अॅड. रवींद्र सोनी व इतर मान्यवर उपस्थित होते. युती शासनामध्ये सहकार राज्यमंत्री राहिलेले वसमतचे डॉ. जयप्रकाश मुुंदडा यांंचा त्यांच्याशी विशेष स्रेह होता. शालेय जीवनात दोघे एकाच ठिकाणी शिकत असल्याने त्यांचे ऋणानुबंध युतीमुळे अधिक दृढ झाले होते. सहा वर्षांपूर्वी हिंगोली येथे झालेल्या पदवीधर मेळाव्याला गोपीनाथ मुंडे यांची विशेष उपस्थिती होती. अडीच वर्षांपूर्वी नगर परिषद निवडणुकीनिमित्त मुंडे यांनी हिंगोलीला दिलेल्या भेटीची आठवण कार्यकर्त्यांच्या अजूनही स्मरणात आहे. (प्रतिनिधी)
झुंजार नेतृत्व काळाच्या पडद्याआड
By admin | Updated: June 4, 2014 00:47 IST