उस्मानाबाद : महापुरूषाची फेसबूकवर विटंबना झाल्याचा निषेध करीत दुकाने बंद करा म्हणून पाच-सहा जणांनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास मोठा धुडगूस घातला़ शहरातील मध्यवर्ती असलेल्या काळा मारूती चौक ते नेहरू चौकादरम्यान हा राडा झाल्याने मोठी दहशत पसरल्याने तत्काळ परिसरातील बाजारपेठ बंद झाली़ मात्र, शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेवून एकास ताब्यात घेतले़फेसबूक या सोशल मीडियावर महापुरूषाची विटंबना झाल्याचा निषेध करीत पाच-सहा समाजकंटकांनी मंगळवारी रात्री हातात काठी, लोखंडी सळई घेवून दुकानांचे शटर खाली ओढत बाजारपेठ बंद करण्यास सुरूवात केली़ अचानक गोंधळ सुरू झाल्याने काळा मारूती चौकात असलेल्या दवाखान्यात आलेल्या रूग्णांसह नातेवाईकांची धावपळ झाली़ गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार सुरू झाल्याने खरेदीसाठी आलेल्या शहरातील महिला, नागरिकांचीही एकच धावपळ उडाली होती़ या टोळक्याने झोरी गल्लीजवळ एका कारवर दगडफेक करीत तिच्या काचा फोडल्या़ घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आदिनाथ रायकर, सपोनि महानभव यांच्यासह सुधाकर भांगे, नवनाथ बांगर, संजय हलसे, चालक मनोज कंकाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली़ पोलिस आल्याचे पाहताच त्या युवकांनी पळ काढला़ यातील एकास पोलिसांनी पाठलाग करून सांजावेस परिसरात ताब्यात घेतले़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता़ (प्रतिनिधी)
बाजारपेठेत समाजकंटकांचा धुडगूस
By admin | Updated: September 10, 2014 00:47 IST