औरंगाबाद : पार्किंगच्या जागेचा वापर व्यावसायिक कारणासाठी ज्या ठिकाणी करण्यात येत आहे, तेथे महापालिकेकडून आता कारवाई सुरू झाली आहे.
महापालिकेच्या पथकाने मंगळवारी जालना रोडवरील एका इमारतीच्या पार्किंगमधील ४ दुकाने जमीनदोस्त केली. शहरात ३९ इमारतींमधील पार्किंगची जागा गायब झाली आहे. नगररचना विभागाने ही ३९ इमारतींची यादी तयार करून अतिक्रमण विभागाकडे सोपविली. त्यानुसार शनिवारी जालना रोडवरील एसएफएस शाळेसमोरील चेतन ट्रेड सेंटरच्या इमारतीत पहिली कारवाई करण्यात आली. नगर रचना विभाग व अतिक्रमण हटाव या दोन विभागांच्या संयुक्त विद्यमाने तेथील पार्किंगची ४ हजार स्क्वेअर फूट जागा मोकळी केली. त्यानंतर मंगळवारी जालना रोडवरच सतबीरसिंग छटवाल यांच्या इमारतीवरही कारवाई केली. या ठिकाणी छटवाल यांनी अतिक्रमण करून ४ दुकाने बांधली होती. ती पाडण्यात आली. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नगररचना विभागाचे सहायक संचालक जयंत खरवडकर, पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, वसंत भोये, आर. एस. राचतवार, मनपा पोलीस निरीक्षक फईम हाश्मी, इमारत निरीक्षक पी. बी. गवळी, सय्यद जमशीद, मजहर अली आदींनी ही कारवाई केली. महापालिकेच्या पथकाने शनिवारी चेतन ट्रेड सेंटरच्या पार्किंगमधील अतिक्रमण हटविले होते. त्याचवेळी बाहेरील बाजूने तीन बेकायदा जिने बांधल्याचेही समोर आले होते. हे जिने काढून घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार संबंधित इमारत मालकाने जिने काढून घेतले.
छायाचित्र आहे