छत्रपती संभाजीनगर : रामकृष्ण बांगर, त्यांचा मुलगा विजयसिंह ऊर्फ बाळा, पत्नी सत्यभामा आणि त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापक आबासाहेब गोपाळघरे या चौघांविरुद्ध बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे यांनी वरील चौघांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.
वरील आरोपींना अटक झाल्यास प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेच्या जामिनावर मुक्त करावे. दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत वरील अपिलार्थ्यांनी दर सोमवारी सकाळी ११ ते १ दरम्यान पोलिस ठाण्यात हजेरी द्यावी, साक्षीदारांना धमकावू नये आदी अटी आदेशात आहेत.
काय आहे तक्रार?याबाबत अमाेल वाघमारे यांनी ११ नाेव्हेंबर २०२४ राेजी तक्रार दाखल केली आहे. त्यात त्यांनी म्हटल्यानुसार बांगर यांनी त्यांच्या संस्थेत नाेकरी लावण्यासाठी २०१८ला ४ लाख रुपये घेतले. नंतर ६ लाख रुपयांची मागणी केली. न दिल्यास नोकरीवरून काढण्याची धमकी दिली. पगार मागितला असता जातिवाचक शिवीगाळ केली. १० नोव्हेंबर २०२४ला पाटोदा येथे बांगर यांच्या घरी ४ लाखांची मागणी केली असता बांगरने जातिवाचक शिवीगाळ केली. त्यावेळी वरील तिघे अपिलार्थी हजर होते. बांगर यांच्या सहकाऱ्यांनी पेट्राेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये १८ टक्के भाजलाे असल्याचे वाघमारे यांनी तक्रारीत नमूद केले. खंडपीठात सुनावणीवेळी पाेलिसांनी या प्रकरणात सी-समरी अहवाल दिला आहे.
अपिलार्थ्यांतर्फे युक्तिवादअपिलार्थ्यांतर्फे युक्तिवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी रामकृष्ण बांगर यांच्याविराेधात कुभांड रचण्यात आले असून, त्यांचे व बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे राजकीय वैर आहे. त्यामुळे बांगर यांनी निवडणूक लढवू नये व त्या काळात अडसर ठरू नये, यासाठी १८ सप्टेंबर ते ११ नाेव्हेंबर २०२४ या काळात बांगर यांच्याविरुद्ध ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तक्रारदाराला सार्वजनिक ठिकाणी नव्हे तर बांगर यांच्या घरात मारहाण व जातिवाचक शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे ‘ॲट्रॉसिटीचा गुन्हा’ होत नाही, असा युक्तिवाद केला.