लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप व रबी हंगामात पिकांना पाणी देण्यासाठी विहिरी, कूपनलिकांवर कृषिपंप बसविण्यास शेतकरी प्राधान्य देतात. मात्र, आवश्यक अनामत रक्कम भरूनही शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळत नाही. तांत्रिक अडचणी व महावितरणच्या उदासीन भूमिकेमुळे जिल्ह्यातील आठ हजार ९५० कृषिपंपांना वर्षभरापासून वीज जोडणी मिळालेली नाही.मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. पाणी उपलब्ध असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी विहिरींवर कृषिपंप बसविण्यास प्राधान्य दिले. २०१६-१७ मध्ये तब्बल चौदा हजार ९६० शेतकऱ्यांनी सुरक्षा अनामत रक्कम भरून वीज जोडणीसाठी अर्ज केला. पैकी सहा हजार १० कृषिपंपाना महावितरणकडून वीज जोडणी देण्यात आली, तर आठ हजार ९५० कृषिपंपांना अद्याप वीज जोडणी मिळालेली नाही. वर्ष २०१७-१८ मध्ये विविध योजनेअंतर्गत अधिकाधिक कृषिपंपांना वीज जोडणी देण्यासाठी महावितरणकडून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सुरक्षा अनामत रक्कम भरून तीन हजार कृषिपंपांना वीज जोडणी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कृृषी विशेष पॅकेजमधून ८१०, जिल्हा विकास आराखड्यातून ४५०, इन्फ्रा अंतर्गत २४०० कृषिपंपांना वीज जोडणी देण्याचे नियोजन करण्यात आले असून, याकरिता ६९ कोटी १२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये जून अखेर तीन हजार, जुलै-सप्टेंबरमध्ये तीन हजार, आॅक्टोबर-डिसेंबरमध्ये तीन हजार आणि जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान दोन हजार ९५० कृषिपंपांना वीज जोडणी देण्याचे प्राथमिक नियोजन करण्यात आले आहे.
साडेआठ हजार कृषीपंप वीज जोडणीविना
By admin | Updated: June 12, 2017 00:24 IST