अवैध चंदनतोडीप्रकरणी वनपाल व वनरक्षक निलंबित !
उंटावरून हाकल्या शेळ्या : पाटणादेवी परिसरात झाली होती चंदनतोडी
कन्नड : वनपाल आणि वनरक्षक यांनी त्यांच्या अधिनस्त बीटमध्ये गस्त न घालता कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून अवैध चंदनतोडीप्रकरणी पाटणा बीटचा वनरक्षक, वनपाल यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी सेवानिवृत्त झालेल्या तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पाटणादेवी परिसरात चंदन प्रजातीच्या वृक्षाची अवैधरीत्या कटाई झाल्याबाबतचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाला होता. यानंतर विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) विजय सातदिवे, सहायक वनसंरक्षक आशा चव्हाण, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शेळके, नागदचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले व त्यांचे अधिनस्त २ वनपाल व ८ वनरक्षकांसमवेत पाटणादेवी परिसरातील जंगलात पाहणी केली. यावेळी त्यांना चंदनाची ३० ते ४० झाडे कटाई झाल्याचे व काही झाडांवर फक्त काट मारून ठेवल्याचे आढळून आले. या प्रकरणाची व्याप्ती पाहता सविस्तर बीट तपासणी करण्यात आली. गायमुखजवळ असणाऱ्या निरीक्षण मनोऱ्यावर आतिक्रमण करून बांधलेली झोपडी हटविण्यात आली. २० मे ते २९ मे २०२१ दरम्यान कण्यात आलेल्या बीट तपासणीत भयंकर प्रकार समोर आला. चंदनाच्या ४९७ झाडांची तोड झाली असून, ५९३ झाडांना फक्त इजा पोहोचविण्यात आली आहे. १० ते ४५ सेमी गोलाईची ४२५ झाडे अवैधरीत्या तोडण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात माल जागेवर पडून असल्याचे आढळले. त्यामधील एकूण ६०७ नग (६.३७१ घनमीटर) माल जमा करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला. झाडे तोडणे, जमीन उकरण्याच्या हत्यारासह इतर साहित्य जप्त करण्यात आले. हा प्रकार दोन वर्षांपासून सुरू असल्याचे दिसले. कन्नड वनपरिक्षेत्रातील २ वनपाल, ३ वनरक्षक व नागद वनपरिक्षेत्रातील ३ वनरक्षक यांची चाळीसगाव वनपरिक्षेत्रात प्रतिनियुक्ती करण्यात आली असून, चंदन तस्करांचा शोध वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शेळके करीत आहेत.
दोघांवर ठपका
या भागातील वनपाल डी. एस. जाधव व वनरक्षक एन.एच. देसले यांनी या भागाची फिरस्ती न करता कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. यानंतर त्यांना २१ मे २०२१ रोजी निलंबित करण्यात आले, तर तत्कालीन वनपरिक्षेत्र आधिकारी एम. डी. चव्हाण हे ३० एप्रिल २०२१ रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र बजावण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.