लोकमत न्यूज नेटवर्कआमठाणा : भारत मातेचे रक्षण करताना दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले केळगाव येथील वीर जवान संदीप जाधव यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी ‘पहिला दिवा शहीद जवानासाठी’ हा स्तुत्य उपक्रम केळगाव ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आला.शहीद संदीप जाधव यांना शहीर होऊन चार महिने झाले; मात्र अद्यापही हे कुटुंब या दु:खातून बाहेर पडलेले नाही. दिवाळी हा सण सर्वत्र साजरा होत असताना केळगावच्या ग्रामस्थांनी पहिला दिवा शहीद संदीप जाधव यांच्या नावाने लावला व त्यांच्या कुंटुबियाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जोपासली. ग्रामपंचायत कार्यालयात संदीप जाधव यांच्या तैलचित्रासमोर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात वीर पिता सर्जेराव जाधव, वीर पत्नी उज्ज्वलाताई जाधव, वीरमाता विमलबाई जाधव यांच्या हस्ते पहिला दिवा लावण्यात आला. यानंतर उपस्थितांच्या वतीने एक-एक दिवा प्रज्वलित करण्यात आला.जाधव कुटुंबाचे दु:ख हलके व्हावे व ते या दु:खातून बाहेर पडावे, हा या कार्यक्रमामागचा उद्देश असल्याचे सरपंच सोमनाथ कोल्हे यांनी सांगितले. याप्रसंगी भारत माता की जय, अमर रहे अमर रहे संदीप जाधव अमर रहे, वंदे मातरम् आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी निर्माण झालेले वातावरण पाहून अनेकांना गहिवरुन आले होते.
पहिला दिवा शहीद जवानासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 00:30 IST