हिंगोली : शहरातील आझम काॅलनी भागात आग लागून चार दुकानांतील साहित्य जळून खाक झाल्याची घटना २९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत जवळपास साडेपाच लाख रूपयांवर नुकसानीचा प्राथमिक अंदाज घटनास्थळी वर्तविण्यात येत होता.
शहरातून जाणाऱ्या कोथळज रोडवर आझम काॅलनी भागातील दुकानांना आग लागली. ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तसेच न.प.अग्निशमन विभागाचा बंबही घटनास्थळी दाखल झाला होता. परंतु, भर दुपारी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविताना व्यत्यय येत होता. अग्निशमन दल जवानांच्या सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात आली. परंतु, या आगीत सोहेलखाॅ वहीदुल्लाखाॅ पठाण यांच्या किराणा दुकानातील जवळपास एक लाख १० हजाराचे साहित्य जळाले. शेख कलीम शेख हबीब यांच्या दुधडेअरीतील सुमारे ९३ हजाराचे साहित्य खाक झाले. तसेच अमीरखाॅन मकसूदखाॅन यांच्या दुकानातील कुलर, पंखे जळाले असून, त्यांचे एक लाख रूपयांवर नुकसान झाले.
याशिवाय शेख फारूख शेख हबीब यांच्या दुकानातील कुलर तसेच इतर इलेक्ट्रिक साहित्य जळाल्याने त्यांचे २ लाख २८ हजार रूपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाच्या वतीने महसूल अधिकारी बद्रीनारायण वाबळे यांनी घटनेचा पंचनामा केला. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास आमदार तान्हाजी मुटकुळे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, महावितरणचे अभियंता रणजिंत देशमुख, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, ॲड.के.के.शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली.