पालम : तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवडीच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांची मजुरी प्रलंबित होती़ या बाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच शासकीय यंत्रणेने हालचाली करून मजुरांना मजुरी अदा केली आहे़ यामुळे मजुरांना आनंद झाला आहे़ पालम तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून मरडसगाव ते चाटोरी व इतर रस्त्यावर दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली होती़ लावलेल्या रोपांची काळजी घेण्यासाठी नोंदणीकृत मजुरांना काम देण्यात आले होते़ मजुरांनी काम करीत वृक्ष जगविले आहेत़ परंतु, या कामावर काम करणाऱ्या जवळपास ७२ मजुरांची मजुरी अनेक महिन्यांपासून प्रलंबित होती़ यामुळे कामात अडथळे निर्माण होत होते़ या बाबत मजुरांची मजुरी थकली या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले़ जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह यांनी दखल घेत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले होते़ रोहयो उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांनी या प्रकरणात लक्ष घालत तहसील कार्यालयाला प्रलंबित मजुरी वाटपासाठी गतीने कारवाई करण्याची सूचना केली़ तहसीलदार अनिल देशपांडे, नायब तहसीलदार कैलाचंद्र वाघमारे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुदाम आवरगंड यांनी तातडीने मजुरीची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी हालचाली केल्या़ यामुळे प्रलंबित थकलेले १३ लाख रुपयांची मजुरी अदा करण्यात आली आहे़ यामुळे सामाजिक वनीकरणच्या वृक्ष लागवड कामास गती मिळणार आहे़ मजुरांना मजुरी मिळाल्याने आनंद झाला असून, मजूरही जोमाने कामाला लागले आहेत़ मजुरांना वेळेवर मजुरी मिळत नसल्याने अनेक मजूर काम करण्यास टाळाटाळ करीत आहेत़ परंतु, आता तहसीलदार यांनी लक्ष घातल्याने मजुरांना मजुरी वेळेवर मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)
अखेर मजुरांना मजुरी मिळाली
By admin | Updated: July 8, 2014 00:34 IST