तामलवाडी : केवळ ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी तुळजापूर तालुक्यातील सावंतवाडी नं. २ या गावाला नळ योजनेतून होणारा पाणीपुरवठा बंद झाला होता. ‘लोकमत’ने ‘माझा गाव-माझा निर्धार’ या मालिकेतून ही बाब समोर आणल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत या गावाला एक दिवसाआड पाणीपुरवठा चालू केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी सुरू असलेली भटकंती थांबली आहे. शेळगाव साठवण तलावाच्या निर्मितीनंतर सावंतवाडी गावाचे दोन ठिकाणी पुनर्वसन झाले. त्या अनुषंगाने पाणी पुरवठा विभागाने दोन गावासाठी संयुक्त पाणी पुरवठा योजनाही तयार केली. परंतु, या योजनेतून सावंतवाडी नं. १ ची तहान भागल्यानंतर सावंतवाडी २ ला पाणी पुरवठा केला जात होता. त्यामुळे दोन्ही गावांना समान पाणी मिळत नव्हते. तसेच जानेवारीपासून सावंतवाडी नं. २ ला होणारा पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे येथील रहिवाशांना घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. याबाबत ‘लोकमत’ने ‘माझा गाव, माझा निर्धार’ या मालिकेच्या माध्यमातून हा प्रश्न समोर आणल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. पाणीपुरवठा योजनेतून गावाला समान पाण्याचा हक्क देवून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्यामुळे येथील रहिवाशांची हेळसांड थांबली असल्याचे सातलिंग बरबडे, रामलिंग बरबडे, सुधाकर साळुंके यांनी सांगितले. (वार्ताहर)
...अखेर ग्रामस्थांना समान पाण्याचा हक्क
By admin | Updated: May 21, 2015 00:28 IST