मंगळवारी रात्री पोलीस कंट्रोल रूमने सर्व वायरलेस ग्रुपला माहिती दिली की, एक संशयित कार (एम.एच.१२,जी.एन.०२८३) ही औरंगाबाद शहरातील गोदावरी टी पाँईटकडून शाहनूर मिया दर्ग्याकडे निघाली आहे.
लगेच पोलिसांच्या टू मोबाईल व्हॅनने या कारचा पाठलाग सुरू झाला. ही कार रोपळेकर हॉस्पिटल, गजानन महाराज मंदिर, सेवन हिल, टी.व्ही. सेंटर, हर्सूल टी पाँईट, दिल्ली गेट, मिल कॉर्नर, बारापुला, छावणी, नगर नाका मार्गे एमआयडीसी मार्गे वाळूज हद्दीत गेल्याची माहिती मिळाली.
यावरून दौलताबाद मोबाईल टू व्हॅनमध्ये पोलीस अंमलदार शरद बच्छाव, सचिन त्रिभुवन, होमगार्ड सय्यद नईम साजापूर येथे थांबले होते. तेव्हा ती कार भरधाव वेगाने नवीन धुळे-सोलापूर महामार्गावरून माळीवाड्याकडे जाताना दिसली. दौलताबाद पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. या पाठशिवणीच्या खेळात फिल्मी स्टाईल अनेकवेळा दोन्ही कार एकमेकांना घासत होत्या. यात मोबाईल टू व्हॅनचे वायरलेस सेटचे वायर तुटले, आरसा, बॅटरीचे झाकणही तुटले. यानंतरही कार थांबत नव्हती. माळीवाडा गावाच्या जवळील उड्डाणपुलाच्या बाजूने संशयित कार परत वळून डिव्हायडरवर चढली. यात टायर फुटल्याने गाैंडवस्तीजवळ कार थांबली. पोलिसांची व्हॅनही मागेच होते. मात्र, पोलीस गाडीबाहेर येईपर्यंत संशयित कारमधील दोघांनी अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. पोलीस निरीक्षक राजश्री आडे घटनास्थळी दाखल झाल्या. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. या श्वानाने माळीवाडा गावापर्यंत माग काढला. यानंतर कार क्रेनच्या साहाय्याने दौलताबाद पोलीस ठाण्यात आणण्यात आली.