लिंबेजळगाव : गेल्या चार ते पाच दिवसांपासून परिसरात बिबट्या आल्याची अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम शेतकामांवर झाला असून शेतकरी, विशेषत: महिला शेतात जाण्यास घाबरत असल्याने कामे रखडली आहेत.
सध्या जिल्ह्यातील विविध भागांत बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. यातच लिंबेजळगाव परिसरात बिबट्या असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. याने मात्र शेतकऱ्यांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या रबीचा हंगाम जोरात सुरू आहे. तसेच शेतकऱ्यांना पिकांना पाणी भरण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जावे लागते. त्यात बिबट्याच्या चर्चेने शेतकरी त्रस्त झाले असून, रात्री शेतात जाणे टाळत आहेत. टेंभापुरी, गुरुधानोरा, दहेगाव बंगला, जिकठाण, तुर्काबादखराडी, रहिमपूर, रामनगर, मुरमी फाटा, अंबेलोहळ, लिंबेजळगाव आदी भागांत गुरुवारी सकाळपासून नागरिक बिबट्याची चर्चा करताना दिसत होते. नागरिकांनी घाबरून न जाता बिबट्या दिसला तर, वन विभाग व पोलीस ठाण्याला कळवावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.