हिंगोली : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला संचमान्यतेचा मुद्दा आता अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती असून शिक्षण समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाल्यानंतर ओरड करणाऱ्या जि. प. सदस्यांच्या आवाजातील हवाच निघून गेली.शिक्षण सभापती अशोक हरण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जि. प. सदस्य गजानन देशमुख, राजाभाऊ मुसळे, दिव्या आखरे, रमेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी डी. आर. चवणे व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.सदस्यांनी पुन्हा एकदा संचमान्यतेचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर शिक्षणाधिकारी चवणे यांनी हे काम आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती दिली. तर पाच ते सात शाळांच्या त्रुटी अजूनही सादर करणे बाकी आहेत. त्या आजच्या आज सादर करण्यास सांगितले होते. त्याचे कामही सुरू असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. त्यानंतर संचमान्यता झाल्यास आंतरजिल्हा बदली व इतर विषय मार्गी लावण्याविषयी चर्चा सुरू झाली. मात्र या संचमान्यतेनंतर शंभरापेक्षा जास्त शिक्षकच अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त करण्यात आली. मागील काही दिवसांत खाजगी व विनाअनुदानित शाळांचे स्तोम वाढले आहे. त्यातही अनधिकृत शाळा असतानाही तेथील प्रवेश वाढत आहेत. मात्र जि.प.च्या शाळांकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे शिक्षण हक्क कायदा येवूनही शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. परंतु पदवीधरच्या पदोन्नत्या झाल्यास पुन्हा पदे रिक्त होतील, असेही चर्चेत सांगण्यात आले. मात्र ही प्रक्रियाही न्यायालयीन चौकटीत अडकल्याने त्यातही फारसे हाती लागेल, अशी चिन्हे तूर्त नाहीत.त्यानंतर कळमनुरी, वसमत व हिंगोली येथील एका उर्दू शाळेच्या स्थलांतरास मान्यता देण्यात आली. हिंगोलीत खुशालनगर परिसरात ही शाळा भरविण्याचा ठराव घेण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)पहिला सेमी इंग्रजी : गशिअला सूचनाग्रामीण असो वा शहरी विद्यार्थी. त्यांचा कल इंग्रजी शिक्षणाकडे वाढत चालला आहे. त्यामुळे मराठी माध्यमातून चालणाऱ्या जि. प. च्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटत चालली आहे. यावर पर्याय म्हणून सर्वच ठिकाणी पहिलीला सेमी इंग्रजीचा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा ठराव जि. प. च्या शिक्षण समितीत घेण्यात आला. त्याबाबत उपस्थित असलेल्या सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या. त्यासाठी सर्व शाळांची आवश्यक पूर्वतयारी करून घेण्यासही सभापती व सदस्यांनी सांगितले.
शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती
By admin | Updated: May 16, 2016 23:55 IST