उस्मानाबाद : एका युवतीवर बार्शी, उस्मानाबाद येथील लॉजमध्ये जबरी अत्याचार करून मारहाण करीत आक्षेपार्ह फोटोची प्रसिध्दी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक किशोर माणिक लवटे (वय-२९) यास उस्मानाबाद येथील अप्पर सत्र न्यायाधीश एस़आय़पठाण यांनी ७ वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली़ याबाबत अतिरिक्त सरकारी वकील पी़वाय़जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेच्या निमित्ताने किशोर माणिक लवटे व पीडित मुलीची ओळख झाली होती़ परीक्षेच्या महत्त्वाचे प्रश्न देण्याच्या व लवटेच्या निवडीची पार्टी बार्शी येथील गौरी लॉजवर असून, तेथे मुलीही असल्याचे भासवून त्या युवतीला बोलावून घेतले़ तेथे तिला जबर मारहाण करून जबरी अत्याचार केला़ त्यावेळी आक्षेपार्ह फोटो काढून त्याद्वारे ब्लॅकमेलींग-बदनामीची भिती दाखवीत सतत दडपणाखाली ठेवले़ त्यानंतर फोटो परत करण्याच्या बहाण्याने पुन्हा उस्मानाबाद येथील सीटी पॅलेस लॉजवर बोलावून हत्याराने जखमी करीत जबरी अत्याचार केला़ त्यानंतर पीडित युवतीने ५ सप्टेंबर २००७ रोजी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली होती़ मात्र, तत्कालीन पोलीस निरीक्षक वडजे यांनी आरोपिताला वाचविण्यासाठी फिर्याद लपवीन चालढकल करीत असल्याबाबत वरिष्ठ अधिकारी, गृहमंत्र्यांपर्यंत जावून अन्यायाला वाचा फोडली होती़ त्यामुळेच तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलीक, राजेंद्र माने, कारभारी या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांनी लक्ष घातल्याचे पाहताच चौकशी समितीद्वारे सत्य शोधून गुन्हा नोंदविला होता़ पीडित युवतीने तत्कालीन पोलीस अधिकारी वडजे यांनी पोलीस अधिकारी असलेल्या आरोपितास वाचविण्यासाठी खरी फिर्याद न घेता खोटी कागदपत्रे व हेतूत: तपासात हलगर्जीपणा केल्याची तक्रार उच्च न्यायालयात देत कारवाईची मागणी मान्य करून घेतली होती़ त्यानंतर हे खळबळजनक प्रकरण सर्वांसमोर आले होते़ त्यानंतर पुणे येथील विशेष सरकारी वकील अॅड़ विजय सावंत यांची नियुक्ती करण्यात आली होती़ या प्रकरणाची उस्मानाबाद येथील अप्पर सत्र न्यायाधीश एस़आय़पठाण यांच्यासमोर सुनावणी झाली़ यावेळी समोर आलेले पुरावे व विशेष सरकारी वकील अॅड़ विजय सावंत यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी किशोर लवटे यास सात वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ तसेच दंड वसूल झाल्यानंतर ती सर्व रक्कम पीडित युवतीला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले़ दंड न दिल्यास अधिक एक वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा वाढविण्याचे आदेशही न्यायाधीशांनी दिले़ या प्रकरणात उस्मानाबाद येथील सरकारी वकील पी़वाय़जाधव यांनी सहकार्य केले़(प्रतिनिधी)सदरील प्रकरणात २ व ३ सप्टेंबर २००७ रोजी उस्मानाबाद येथे मारहाण करून जबरी अत्याचार केल्याने पीडित युवतीने विषारी द्रव प्राषण करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता़ त्यातून ती शुध्दीवर आल्यानंतर तिच्या आईने तिला धीर देत लढण्यासाठी मनोबल दिले होते़ त्यानंतर पीडित युवतीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यापासून आरोपिस शिक्षा होईपर्यंत जिद्दीने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानेच हा गुन्हा सिध्द होवू शकल्याचे सत्र न्यायाधीश एस़आय़पठाण यांनी ६७ पानी निकालपत्रात स्पष्ट केले आहे़ तसेच प्रारंभिक तपास यंत्रणा हा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न करीत असताना तत्कालीन गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालताच कार्यप्रणव झाल्याचेही नमूद केले आहे़
फौजदारास सक्तमजुरी
By admin | Updated: May 15, 2015 00:49 IST