ऑनलाईन लोकमत
माजलगाव (बीड), दि. ११ : अवैध वाळू उपसा केल्याने गोदावारी व सिंधफना नदीपात्रा शेजारील गावांची धुळधान उडवली आहे. वाळुमाफियांनी दोन्ही नदीपात्रांचे तसेच गावातील रस्त्यांच्या अवस्था अत्यंत खराब केली आहे. हा त्रास दिवसेंदिवस वाढतच जात आहे यामुळे प्रशासनाने याचा तात्काळ बंदोबस्त करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी थेट सिंदफना नदीपात्रात उपोषण सुरु केले आहे.
तालुक्यातील सादोळा, आळसेवाडी, छत्रबोरगांव, अंधापुरी, नागडगांव, काळेगांव, मंजरथ, डुब्बाथडी, पुरुषोत्तमपुरी, रिधोरी परिसरातील नागरीक अवैध वाळू वाहतुकीने हैराण झाले आहेत. गावांतून जाणा-या सर्व रस्त्यांची या वाहतुकीने धुळधान उडाली आहे. यावर प्रशासनही कोणतीच दाखल घेत नसल्याने सांडस चिंचोली, आळसेवाडी, नागडगांव, बोरगांव, रोषनपुरी, शिंपेटाकळी या गावांमधील ग्रामस्थांनी थेट सिंदफना नदी पात्रात उपोषण सुरु केले आहे . वाळु माफियांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. सिंदफना व गोदावरी नदीपात्रात माजलगांवचे उपविभागीय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी एक वर्षापूर्वी या ठिकाणी कलम 144 लागु केलेले आहे. या आदेशाची अंमलबजावणी पोलीसांनी करावी अशी देखील मागणी उपोषणकत्र्यांनी केली आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष्य
गोदावरी नदी पात्रा पाठोपाठ आता सिंदफना नदीपात्राला देखील वाळु माफियांनी पोखरणे सुरु आहे. याचा सर्वात जास्त त्रास नदीपात्राशेजारील गावांना होतो. वाळुमाफिया, महसूल आणि पोलीस यांची हातमिळवणी असल्याने वाळूमाफियांना काही अंशी अभय मिळत आहे. एकीकडे गेवराईचे तहसीलदार हे वाळुची गाडी पकडल्यानंतर जोपर्यंत कारवाई करीत नाहीत तोपर्यंत गाडीजवळच मुक्काम टाकुन वाळुमाफियांविरोधात फास आवळुन एक उत्तम उदाहरण ठेवतात. दुसरीकडे माजलगांवचे महसुल प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे वाळुमाफियांना अभय देत आहे असे चित्र आहे. वाळूमाफियांयाबद्दल प्रशासनाकडून माहिती विचारली असता वाळुचे ठेकेच दिलेले नाही त्यामुळे वाळुमाफियाशी आमचा कांही संबंध नाही असे उत्तर मिळते. रात्रीच्या गस्तीत एकाही गाडीवर कारवाई नाही माजलगाव ग्रामीण पोलीसांनी विविध ठिकाणी रात्रीच्या गस्त सुरु केल्या आहेत. या गस्तीमध्ये पोलीस अवैध वाहतूक करणा-या गाडया पकडतात. मात्र, अनेक दिवसांपासुन एकाही गाडीवर कारवाई केल्याचे पहावयास मिळत नाही.