बी़व्ही़चव्हाण, उमरीतालुक्यात उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी आल्याने या भागातील शेतकरी सुखी झाला़ सर्वत्र शेती हिरवीगार व प्रसन्न दिसू लागली़ मात्र या प्रकल्पाच्या पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन होण्याच्या दृष्टीने यात शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग होणे अत्यंत जिकिरीचे बनले आहे़चालू वर्षाच्या उन्हाळा हंगामातच पिकांना पुरेसे पाणी मिळत नाही़ गेल्या हंगामात नांदेड जिल्ह्यात कमी पाऊस झाला तरी विदर्भात पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी होते़ म्हणून इसापूर धरणात पाणीसाठा झाला़ त्यामुळे १० ते १२ पाणीपाळी या भागातील शेतीला मिळाली़ अगदी जून महिन्यापर्यंत पाणीपाळी आली़ यावर्षी धरणातच कमी साठा असल्याने मर्यादा आली़ तरीही गेल्या दोन दिवसांपासून नांदेड व हिंगोली जिल्ह्यासाठी १७५ दलघमी आरक्षित पाण्यामुळे ३५ दलघमी पाणी सोडण्यात आले़ सध्या ६ ते ७ दिवस हे पाणी चालू राहणार आहे़ अर्धापूर, मुदखेड शिवारातून हे पाणी जामगाव, सिंधी, शेलगाव, अब्दुलापूरवाडी, तळेगाव, गोरठा, नागठाणा, बेलदरा, हातणी शिवारातून गोदावरी नदीमध्ये आले आहे़ पुढे राहेरपर्यंत १९ मार्च रोजी पाणी गेले़ या पाण्याचा यावर्षी सिंचनासाठी वापर करता येणे शक्य नसले तरी जनावरांना वरदान ठरणारे आहे़ कारण उमरी तालुक्यातील २४ कि़मी़ अंतराच्या गोदावरी नदीपात्राला वाळवंटाचे स्वरूप आले आहे़ मुक्या जनावरांना कुठेच पाणी मिळत नाही़ सध्या युपीपी मुख्य कालव्यातून गोदावरीला पाणी सोडल्याने जनावरांची मोठी सोय झाली़ उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या या पाण्याचा वापर शेती सिंचनासाठी होत असताना अजूनही बऱ्याच तांत्रिक बाबी दुर्लक्षित राहिल्या आहेत़ कालव्यामध्ये वाढलेली झुडुपे, गवत तसेच अस्तरीकरण हा प्रमुख अडसर आहे़ आठवडाभरापासून १६ ते २२ मार्च पर्यंत उमरी भागात जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे़ गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद व उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळ नांदेड यांच्या वतीने या सप्ताहाचे आयोजन केले आहे़ पाणीवापर संस्था स्थापन करून पाणी व्यवस्थापनात शेतकऱ्यांचा पर्यायाने लाभार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविण्याचा हा प्रयत्न महत्त्वाचा ठरणारा आहे़ पाणी व जमीन ही शेतकऱ्यांच्या जीवनातील प्रमुख अंग आहेत़ या नैसर्गिक साधनांचा उपयोग शेतकरी व प्रशासन यांच्यातील समन्वयाने झाल्यास सिंचनाचे व्यवस्थापन आणखी सुलभ होईल़ पाण्याचा होणारा अपव्यय टाळता येईल़ म्हणून शासनाने पाणी वापर संस्थेच्या निर्मितीची संकल्पना पुढे आणली़ यासाठी संस्था स्थापन करण्यापासून संस्थेचे अधिकार व कर्तव्य शासनातर्फे संस्थेस देण्यात येणाऱ्या सोयी सवलती याची सविस्तर माहिती देण्यात येत आहे़ संस्थेच्या नावाची नोंदणी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात करण्यात येते़ पाणीवापर संस्थेचे कार्यक्षेत्र ५०० हेक्टरपर्यंत असल्यास प्रत्येक भागातून ३ याप्रमाणे एकूण ९ संचालकांची व कार्यक्षेत्र ५०० हेक्टरपेक्षा अधिक असल्यास प्रत्येक भागातून ४ याप्रमाणे एकूण १२ संचालकांची निवडणुकीद्वारे निवड करण्यात येते़ प्रत्येक भागात १ पद महिला संचालकासाठी राखीव असेल व निवडून आलेल्या संचालकांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात येणार आहे़ संस्था स्थापन झाल्यानंतर वितरण व्यवस्थेचे सिंचन अधिकारी व संचालक, अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी संयुक्त पाहणी करावी व त्यानुसार वितरण व्यवस्थेतील उणीवा, त्रुटी व दुरुस्त्या शासनाकडून करून घ्याव्यात असा नियम आहे़ संस्थेला पाणीपट्टी व किमान आकार आकारण्याचा अधिकार आहे़
सिंचन व्यवस्थापनात शेतकऱ्यांचा सहभाग
By admin | Updated: March 20, 2016 23:46 IST