उस्मानाबाद : जिल्ह्यातील बँकांना खरीप पीक कर्ज वाटपासाठी ४८२ कोटींचे उद्दिष्ट दिलेले असताना बँकांनी आजवर ३३७ कोटी ८१ लाख रुपयांचे वाटप केले आहे. आजही १४५ कोटी रूपयांचे वाटप करणे बाकी असल्याचे समोर आले आहे. वारंवार बैठका घेवूनही बँका जिल्हाधिकाऱ्यांना जुमानत नसल्याचे पहावयास मिळत आहे. ऐन पेरणीच्या काळात पावसाने ओढ दिली. तरीही शेतकऱ्यांनी न डगमगता पेरणी उरकली. अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्जाच्या भरवशावर उसनवारी करून गरज भागविली. परंतु, अर्ज दाखल करूनही कर्ज मिळत नाही, अशी ओरड मागील काही दिवसांपासून होत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीही दाखल झाल्या आहेत. बळीराजा या गैरसोयीला तोंड देत असतानाच काही राष्ट्रीयकृत बँकांनी खाजगी नियमापेक्षा जास्त व्याज आकारल्याचेही समोर आले होते. या दुहेरी संकटामुळे बळीराजा अक्षरश: हवालदिल झाला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात ८९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. वेळेवर पेरणी उरकेल, अशी अपेक्षा असतानाच पावसाने ओढ दिली. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या सुरूवातीला सलग तीन-चार दिवस संततधार पाऊस झाला तसेच आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या पावसाने पिकांना जीवनदान मिळाले आहे. दरम्यान, मार्च-एप्रिल महिन्यातील अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असतानाच बँकांकडून कर्ज देण्यासही टाळाटाळ होत असल्याने ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. ऐनवेळी पैसा उभा करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना खाजगी सावकाराचे उंबरठेही झिजवावे लागले. वास्तविक पैशाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबू नयेत, या उद्देशाने शासनाने जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामासाठी ४८२ कोटी ९४ लाख रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. बँकांकडून यापैकी केवळ ३३७ कोटी ८१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून जवळपास १४१ कोटी रुपयांचे पीक कर्ज अद्यापही वाटप झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अशा बँकांवर आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)
कर्जासाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट !
By admin | Updated: September 10, 2014 00:47 IST