लातूर : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील अनेक गावे सिंचनाखाली यावीत या उद्देशाने २०१५-१६ मध्ये २०२ तर २०१६-१७ मधील १७६ गावातील सुरू असलेली कामे पावसाळ्यामुळे वेळेत होणार नाहीत़ ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने या उर्वरित रखडलेल्या कामासाठी डिसेंबरपर्यंतचा कालावधी दिला असल्याने जलयुक्तची शंभर टक्के कामे पूर्ण होणार आहेत़ जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ मध्ये २०२ गावांची निवड करून त्या गावातील कम्पार्टमेंट बिल्डींग, सलग समतलचर, मातीनाला बांध, बंधारे, गॅबियन बंधारे, दगडी बांध, शेततळी, वनतळी, सिमेंट साठवण बंधारा, भूमिगत बंधारा, कोल्हापुरी बंधारे, विहीर पुनर्भरण, बोअर पुनर्भरण, पुनर्भरण चर, रिचार्ज शॉफ्ट, शोषखड्डे, जलभंजन, वृक्ष लागवड, रोपवाटिका, पाणी वाटप संस्था बळकटीकरण करणे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, सिमेंट नाला बांध, विहीर खोलीकरण, नाला खोलीकरण, गाळ काढणे आदी ३२ कामे सुरू करण्यात आली़ ५७८७९ हेक्टर क्षेत्रावरील ६४९२ कामापैकी ४४१७ कामे पूर्ण झाली आहेत़ तर २०७५ कामे अद्यापही रखडलेली आहेत़ पावसाळ्याच्या कालावधीत जलयुक्तची कामे करता येत नसल्याने या कामासाठी डिसेंबर २०१६ पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे़ आतापर्यंत झालेल्या ४४१७ कामावर ७६ कोटी १२ लाखाचा खर्च झाला आहे़ त्यातच २०१६-१७ मध्ये १७६ गावाची निवड करून त्यासाठी २६३ कोटी ११ लाखाच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे़ यामध्ये ११५९१ कामाचा समावेश करण्यात आला आहे़ त्यामुळे पावसाळ्याअखेर या कामाला गती मिळणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले़
जलयुक्तच्या २०७५ कामांना मुदतवाढ
By admin | Updated: August 28, 2016 00:18 IST