लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड:जिल्हा परिषदेत सोमवारी आयोजित केलेल्या जलव्यवस्थपन व स्वच्छता समितीच्या बैठकीस दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींची जि़ प़ अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांनी हकालपट्टी करून यापुढे प्रत्येक बैठकीस संबंधित अधिकाऱ्यांनीच हजर रहावे, अशा सूचना केल्या़ जि़ प़ अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती तसेच स्थायी समितीची सभा पार पडली़ या दोन्ही सभेत विकास कामांचा आढावा घेण्यात आला़ जिल्ह्यात जलव्यवस्थानची कामे सुरू असून मागील तीन महिन्यांत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविण्यात आल्या, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला़ यावेळी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गायकवाड यांनी ६७७ प्रस्तावित विंधन विहिरींपैकी शंभरांहून अधिक विहिरींचे सर्वेक्षण करून प्रत्यक्षात ४३ विंधन विहिरींचे अधिग्रहण केले़ १ हजार २१ प्रस्तावित संख्येपैकी १४० गावांसाठी १८३ विहिरींचे अधिग्रहण केल्याचे तसेच ग्रामपंचायतस्तावर विहीर अधिग्रहणाचे २०७ तर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी २२४ प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती दिली़ यासंदर्भात सदस्यांनी टंचाईचे प्रस्ताव सादर करण्यासाठी महसूल विभागाच्या अत्यावश्यक केलेल्या विविध प्रमाणपत्रांची अट रद्द करावी, असा ठराव घेतला़ या कागदपत्रांशिवाय प्रस्ताव सादर करणे अवघड होत असल्याने अनेक प्रस्ताव मंजुरीअभावी पडून आहेत़ त्यामुळे या प्रमाणपत्रांची अट शिथिल करावी, अशी मागणी सदस्यांनी केली़ प्रतिनिधींची हकालपट्टीजिल्हा परिषदेत आयोजित केलेल्या जलव्यवस्थान समितीच्या सभेला पाटबंधारे विभाग, लघुपाटबंधारे विभाग, महावितरण, वनविभागाचे अधिकारी नेहमीच गैरहजर राहत आहेत़ त्यामुळे अनेक विषय रेंगाळले आहेत़ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे विकासकामांना फटका बसत आहे़ काही अधिकारी आपले प्रतिनिधी म्हणून कर्मचाऱ्यांना सभेला पाठवित आहेत़ ही बाब आजच्या सभेत ऐरणीवर आली़ अधिकाऱ्यांना सभेला यायचे नसेल तर कर्मचाऱ्यांना तरी कशासाठी पाठविता़, असा सूर सदस्यांनी आळवला़ त्यामुळे जि़ प़ अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांनी अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला़ यापुढे अधिकाऱ्यांनीच सभेला हजर रहावे, अशा सूचनाही अध्यक्षांनी दिल्या़ स्थायी सभेला उपाध्यक्ष समाधान जाधव, सभापती शीला निखाते, सभापती मधुमती कुंटूरकर, दत्तात्रय रेड्डी, माधवराव मिसाळे, विजय धोंडगे, संजय बेळगे, प्रवीण पाटील चिखलीकर, पूनम पवार तर स्वच्छता समिती सभेस प्रकाश भोसीकर, लक्ष्मण ठक्करवाड यांची उपस्थिती होती़
अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींची हकालपट्टी
By admin | Updated: June 13, 2017 00:40 IST