जालना : गेल्या दहा-बारा दिवसांपासून राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांकडून उडालेला प्रचाराचा धूराळा अखेर सोमवारी सायंकाळी पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये शमला. प्रचारासाठी कमी कालावधी मिळाल्याने उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी जिवाचा आटापिटा केला. प्रचार संपला असला तरी मंगळवारी मतदारांच्या वैयक्तिक भेटी घेत मूकप्रचार सुरू राहिल, अशी शक्यता आहे.१ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर खऱ्या अर्थाने उमेदवारांच्या प्रचाराने जोर धरला. अगोदरच कमी कालावधी मिळाल्याने तसेच युती व आघाडीमध्ये फूट पडल्याने काही नवीन चेहरे उमेदवार म्हणून समोर आल्याने जवळपास सर्व मतदारसंघात निवडणूक चौरंगी, पंचरंगी अशीच होत असल्याची चिन्हे निर्माण झाली. प्रत्येक मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून शहरी व ग्रामीण भागातील प्रमुख रस्ते रॅली, पदयात्रांनी गजबजलेले असत. ध्वनिक्षेपकांसह झेंडा लावलेल्या वाहनांद्वारे पक्षांचा प्रचार करणारी गिते मतदारांना ऐकविली जात. प्रत्येक भागात कोणत्या ना कोणत्या उमेदवारांची रॅली दिसून येत होती. विविध राजकीय पक्षांचे समर्थक घरोघर भेटी देऊन आमच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन करताना दिसत होते. सर्वच प्रमुख उमेदवारांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली असून रॅली, पदयात्रा, रोड शोच्या माध्यमातून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले. दररोज कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने रस्ते दुमदुमून जात होते. पक्षाचे चिन्ह असलेली टोपी, रुमाल, झेंडे हातात घेऊन चौकाचौकात विविध पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवारांचेही कार्यकर्ते दिसून येत होते. काही मतदारसंघात प्रमुख नेत्यांच्या सभांसह उमेदवारांनी छोटेखानी सभाही घेतल्या. महिलांनी पदयात्रांद्वारे मतदारांच्या भेटी घेतल्या. गेल्या दहा-बारा दिवसांमध्ये हॉटेल्स, ढाबेही गजबलेले होते. (प्रतिनिधी)
अखेर प्रचाराच्या तोफा थंडावल्या
By admin | Updated: October 14, 2014 00:32 IST