शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत आला दुभंग तरी कायम ‘अभंग’! बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रावरून वादंग

By नंदकिशोर पाटील | Updated: April 25, 2024 11:49 IST

महायुतीकडे ‘मोदी गॅरंटी’ असताना बाळासाहेबांचा फोटो वापरण्याची गरज का पडली, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे

छत्रपती संभाजीनगर : महायुतीच्या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र वापरण्यात आले, यावरून बरेच वादंग माजले आहे. महायुतीकडे ‘मोदी गॅरंटी’ असताना बाळासाहेबांचा फोटो वापरण्याची गरज का पडली, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे, तर बाळासाहेब ही कोणाची खासगी प्रॉपर्टी नाही. आमच्यासाठी ते आजही वंदनीय आहेत, असे स्पष्टीकरण शिंदेसेनेकडून देण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती आणि बुलडाणा अशा आठ मतदारसंघांत ७ मे रोजी मतदान होणार आहे. प्रामुख्याने पश्चिम विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातील या आठ जागांवर नजर टाकली, तर भाजप आणि शिवसेनेचे बलाबल समसमान आहे. अमरावती, अकोला, वर्धा आणि नांदेड येथे भाजपचे खासदार आहेत, तर बुलडाणा, यवतमाळ, हिंगोली आणि परभणीत शिवसेनेचे. थोडक्यात काय, तर हा सगळा टापू बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भात मतदानाचा टक्का खूपच घसरला, शिवाय तिथे महायुतीला फटका बसू शकतो, अशी चर्चा आहे. म्हणूनच महायुतीने या मतदारसंघातील जाहिरातीत बाळासाहेबांचे छायाचित्र वापरले असावे, असा तर्क काढता येतो. शिवसेना दोन गटांत विभागली गेली असली, तरी स्व.बाळासाहेबांचे स्थान दोन्हीकडे अढळ आहे. म्हणूनच, शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले होते, एक वेळ पक्ष, चिन्ह नेले हे समजू शकतो, पण त्यांनी तर माझा बापही पळविला!

गुलमंडी ते दिल्ली!बाळासाहेब ठाकरे यांचे मराठवाड्याशी खूप जुने नाते आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी ८ जून, १९८५ रोजी गुलमंडीत शिवसेनेची शाखा सुरू झाली आणि मुंबई-ठाण्यात ऐकू येणारी ‘जय भवानी-जय शिवाजी’ ही घोषणा औरंगाबादेत घुमू लागली. एरवी मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेने १९८४ च्या भिवंडी दंगलीनंतर हिंदुत्ववादी भूमिका घेतली. त्याचा फायदा झाला. औरंगाबाद ही तर या भूमिकेसाठी अगदी सुपीक भूमी होती. बाळासाहेबांच्या जहाल हिंदुत्ववादी भूमिकेमुळे भारावलेल्या तरुणांची फौज गावोगावी शिवसेनेची शाखा स्थापन करू लागली. १९८८ च्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना राजकारणात उतरली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मराठवाड्यातली पहिली सभा झाली. त्यावेळी प्रथमच शिवसेनेचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले. ‘खान हवा की बाण’ अशी आक्रमक भूमिका घेत, महापालिका निवडणुकीत उतरलेल्या शिवसेनेला मिळालेले हे यश होते. मुंबई-ठाण्यानंतर शिवसेनेला मिळालेला हा पहिला मोठा विजय होता. याच पाठबळावर १९८९ साली मोरेश्वर सावे खासदार म्हणून निवडून आले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा, ही बाळासाहेबांची मागणीही प्रचंड गाजली.

नामांतर आणि बाळासाहेबमराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध होता. ६ डिसेंबर, १९९४ रोजी नांदेडच्या जाहीर सभेत बाळासाहेबांनी, ‘ज्यांच्या घरी नाही पीठ, त्यांना कशाला हवे विद्यापीठ?’ असा बोचरा सवाल केल्याने संघर्षाची ठिणगी पडली. त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली. शरद पवारांनी विद्यापीठ नामांतराची घोषणा केली आणि बाळासाहेबांनी आपल्या टीकेची धार आणखीच तीव्र केली. शिवसेनेला याचा राजकीय फायदा झाला. १९९५ सालच्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात शिवसेनेचे दहा आमदार निवडून आले. नामांतर आंदोलनानंतर मराठवाड्यात शिवसेनेचा विस्तार झपाट्याने झाला. विद्यापीठाचा नामविस्तार झाल्यानंतर, ठाकरे यांची भूमिका मवाळ झाली. ते म्हणाले, ‘ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावास माझा विरोध नव्हता, तर मराठवाड्याचा लढाऊ इतिहास पुसला जाऊ नये, एवढेच आमचे म्हणणे होते!’

परभणीची सभा आणि...२१ फेब्रुवारी, १९९४ रोजी परभणीत झालेली बाळासाहेब ठाकरे यांची सभा खूप गाजली. तत्पूर्वी, औरंगाबाद दंगलीनंतर निषेध सभा घेण्यासाठी निघालेल्या ठाकरे यांना पोलिसांनी पुण्याजवळ अडविले होते. बाळासाहेबांनी तो प्रसंग परभणीच्या सभेत सांगितला. ते म्हणाले, मला अटक झाली असती, तर त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटले असते, म्हणून मी माघारी फिरलो. बाळासाहेबांच्या त्या सभेने परभणी, हिंगोली आणि शेजारच्या नांदेड जिल्ह्याचा राजकीय पट बदलला. १९९८ चा अपवाद वगळता गेल्या ३३ वर्षांपासून परभणीत शिवसेनेचा खासदार निवडून येत आहे, तर १९९१ साली विलासराव गुंडेवार यांनी हिंगोलीत शिवसेनेचे खाते उघडले आणि त्यानंतर हिंगोलीत पाच वेळा शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत.

चौकार मारणार का?उद्धवसेना मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, उस्मानाबाद आणि औरंगाबाद अशा चार जागा लढवित आहे. संजय उर्फ बंडू जाधव (परभणी), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद) हे दोन खासदार उद्धवसेनेत, तर हेमंत पाटील (हिंगोली) हे शिंदेसेनेत आहेत. मात्र, त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. पाटील यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांनी यवतमाळ-वाशिममध्ये उमेदवारी देण्यात आली आहे. औरंगाबादेत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पुन्हा मैदानात उतरविण्यात आले आहे. उद्धवसेनेचे चारही उमेदवार तुल्यबळ आहेत. महायुतीच्या उमेदवारांची कसोटी लागणार आहे. उद्धव ठाकरे यावेळीही चौकार मारणार का, याबाबत औत्सुक्य आहे.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादparbhani-pcपरभणीosmanabad-pcउस्मानाबादhingoli-pcहिंगोलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४