औरंगाबाद : किलेअर्क येथील महापालिकेच्या कोविड रुग्णालयाच्या खिडकीचे गज वाकवून रविवारी रात्री पलायन करणारे दोन कैदी १४ तासानंतरही पोलिसांच्या हाती लागले नाही. अक्रमखान अयाज खान (२७ , रा . जटवाडा )आणि सय्यद सैफ सय्यद असद (२४ , रा नेहरूनगर कटकट गेट )अशी फरार झालेल्या कैद्यांची नावे आहेत. ते जेवढ्या लोकांच्या संपर्कात येतील त्या सर्वांना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह कैदी फरार झाल्याचे कळताच नागरिकांमध्ये भातीचे वातावरण आहे.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, आरोपी अक्रमखान छावणी परिसरातील खुनाचा आरोपी असून, तो २०१८ पासून, तर आरोपी सय्यद सैफ बनावट नोटा चलनात आणल्याच्या आरोपाखाली १ नोव्हेंबर २०१९ पासून हर्सूल कारागृहात आहे. दरम्यान, त्यांच्यासह २९ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे शनिवारपासून त्यांच्यावर किलेअर्क येथील महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांना दुसऱ्या मजल्यावरील १५ खोल्यात प्रत्येकी २ कैदी असे ठेवण्यात आले. या कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी कारागृहाचे दिवसरात्र एकूण १२ कॉंस्टेबल आणि दोन तुरुंग अधिकारी तैनात होते. रविवारी रात्री नियंत्रण अधिकारी म्हणून तुरुंग अधिकारी के . ए . काळे यांची नेमणूक करण्यात आली होती . रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास दोन्ही कैदी बाथरुमच्या खिडकीचे गज वाकवून आणि चादर खिडकीला बांधून पसार झाले. या घटनेला १४ तास उलटल्यानंतरही त्यांचा कोणताही माग पोलिसांना लागला नाही. गंभीर गुंह्यातील आणि कोरोना पॉझिटिव्ह कैदी असल्यामुळे त्यांना पकडणे पोलिसांसाठी आव्हानात्मक झाले आहे . दरम्यान, गुन्हेशाखा आणि बेगमपुरा ठाण्यातील अधिकारी , कर्मचारी यांची पथके दोन्ही कैद्यांचा शोध घेत आहेत.
एक कर्मचारी निलंबित, अधिकाऱ्याची चौकशीया घटनेची गंभीर दखल घेत जेल प्रशासनाने कॉंस्टेबल प्रशांत देवकर यांना तडकाफडकी निलंबित केले असून तुरुंग अधिकारी ए . के . काळे यांची खातेनिहाय चौकशी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली आहे.