वेरूळ : सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाचे अवघ्या काही महिन्यांतच पितळ उघडे पडले आहे. दोन दिवसांपासून झालेल्या तुरळक पावसातदेखील वेरूळ येथील पूल खचला आहे, तर रस्त्यावर जागोजागी पाणी साचले असून, कठड्याचे संरक्षक बेल्ट निसटला आहे. त्यामुळे अपघाताच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
सोलापूर- धुळे महामार्गावरील वेरूळ पूल व कन्नडजवळील रेल पूल, तसेच बायपासजवळील रस्ता पूर्णपणे खचला आहे. परिणामी, अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. या महामार्गाचे बांधकाम होऊन दोन वर्षेदेखील पूर्ण झाले नाही. तोच कंत्राटदार व संबंधित अभियंत्यांच्या कामाचा प्रताप पाहावयास मिळत आहे.
पुलाच्या मध्यभागी बांधकामातील लोखंडी गज वर निघाले आहेत. त्यामुळे वाहनांचा अपघात त अचानक टायर फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्याची लेव्हल व्यवस्थित नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचत आहे. दुभाजक पाण्यात बुडाला जात आहे. परिणामी, अतिवेगात येणाऱ्या वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघात होऊ लागले आहेत. वेरूळ पुलालगत तांडा वस्तीवरील लोकांना रस्ता ओलांडून जावे लागते. तेव्हा भरधाव वेगात येणारे वाहने आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
----
बस खड्ड्यात, चाक रस्त्यावर, अपघात टळला
महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने पावसाचे पाणी साचत आहे. परिणामी, वेगात येणाऱ्या वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज लागत नाही. परिणामी, गेल्या काही दिवसांत वेरूळलगत आठ जणांचा अपघात झाला असून, यात हात-पायाला गंभीर दुखापत झाल्याची पोलिसांकडे नोंद आहे. शनिवारी सकाळी चक्क कन्नड- पुणे बस खड्ड्यात आदळल्याने टपावरील स्टेफनी असलेले मोठे चाक रोडवर येऊन पडले. यादरम्यान रस्त्यावर अन्य वाहन नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
---