सोयगाव : शेतात मशागतीचे काम करताना शेतातील मोसंबीच्या झाडावर तुटून पडलेल्या मुख्य वीजपुरवठ्याच्या तारेला चिटकून ३५ वर्षीय शेतकऱ्याचा रविवारी दुपारच्या सुमारास जरंडी येथे दुर्दैवी मृत्यू झाला.
अमोल अशोक पाटील असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. सोयगाव तालुक्यातील जरंडी शिवारात चार दिवसांपासून महावितरणच्या शेती पंपाच्या मुख्यावीज वाहिनीची वीजतार अमोल यांच्या शेतातील मोसंबीच्या झाडावर तुटून पडलेली होती. शनिवारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ही वीज तार रात्रीच झाडावरून जमिनीवर पडली आणि भीज पावसात जमिनीत पुरल्या गेली.
अमोल हे नेहमीप्रमाणे वीजेची तार झाडावर असल्याचे समजून मोसंबी पिकाच्या नुकसानीची मशागत करत असतानाच अचानक त्यांच्या पायाला वीजेची तार लागली. तार हाताने काढण्याच्या प्रयत्नात त्यांचा तारेला चिटकून जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी शिताफीने त्यांना वीजतारेच्या कचाट्यातून बाहेर काढले.
चार दिवसांपासून परिसरातील शेतकरी तुटलेली वीज तार जोडण्यासाठी महावितरण विभागाला कळवत होते. मात्र महावितरण विभागाकडून कुणीही दुरूस्तीसाठी आले नाही. महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अमोल यांचा मृतदेह तासभर महावितरणच्या सोयगाव कार्यालयासमोर आणून ठेवला. परंतु अखेरीस पोलिसांनी मध्यस्ती करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात आणला. याप्रकरणी मृत शेतकऱ्याचे मामा तथा जिल्हा बँकेचे माजी संचालक श्रीराम चौधरी यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी फिर्याद दिली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, उपनिरीक्षक युवराज शिंदे, जमादार संतोष पाईकराव, दिलीप तडवी, संदीप चव्हाण आदी पुढील तपास करत आहेत.