अमरिकसिंघ वासरीकर, नांदेडमहापालिका प्रशासनाच्या संगणमताने गुरुद्वारा गेट क्र. १ मार्गावरील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असून किरकोळ विक्रेत्यांनी आपली दुकाने व हातगाडे रस्त्याच्या मधोमध थाटल्याने भाविकांना ये-जा करण्याकरीता मार्ग उरला नाही. परिणामी लहान-सहान अपघात नित्याचेच झाले आहेत.सचखंड गुरुद्वाराच्या दर्शनाकरीता गेट क्र. १ मार्गावरुन मोठ्या प्रमाणावर भाविकांची वर्दळ असते. बाहेरगावची वाहने, स्थानिक वाहने या मार्गावरुन मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. गुरु-ता-गद्दी त्रिशताब्दी समारोहाच्या निमित्ताने या मार्गावरील राहणाऱ्या रहिवाशांची जमिन महापालिकेने संपादित केली व रस्त्याचे रुंदीकरण केले. रस्त्यालगत दहा फुटांचे फुटपाथ टाकण्यात आले. यामुळे या मार्गावर असलेल्या अनेक व्यापाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. जागा संपादित करताना महानगरपालिका व गुरुद्वारा बोर्डाने या मार्गावरील व्यापाऱ्यांना स्वतंत्र व्यापारी संकुल बांधून देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. गुरु-ता-गद्दी महोत्सव होऊनही आजमितीस सहा वर्षे उलटली तरी निर्वासित झालेल्या व्यापाऱ्यांना अद्यापपर्यंत त्यांना स्वतंत्र असे व्यापारी संकुल मिळाले नाही. मार्ग क्र. १ वर किरकोळ विक्रेते व हातगाडेवाल्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे.तसेच येथे चारचाकी वाहन मोठ्या प्रमाणावर उभे करण्यात येत आहेत. यामुळे गुरुद्वारा दर्शनाकरीता जाणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत आहे. वृद्ध भाविकांना चालनेही कठीण झाले असून या मार्गावर लहान-सहान नित्य अपघात होत आहेत. तर भुरटे चोर भाविकांच्या पाकिटावर डल्ला मारत आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाला अनेक वेळा या मार्गावरील अतिक्रमण हटविण्याकरीता विनंती केली. परंतु महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक येथे थोडेफार अतिक्रमण दूर करण्याचा प्रयत्न करते, अशी स्थानिकांची तक्रार आहे. महापालिकेचे पथक निघून गेल्यानंतर हे फुटपाथवरील व्यापारी परत आपल्या पूर्व जागेवर येऊन आपले बस्तान मांडतात. आगामी काळात दसरा महोत्सवानिमित्त सचखंड येथे देश-विदेशांतून लाखो भाविक येणार आहेत. येथे नगरकीर्तनाचे आयोजन करण्यात येते. हे नगरकीर्तन गेट क्र. १ वरुन जाते. फुटपाथवर अतिक्रमण केलेले व्यापारी व हातगाडे आपले साहित्य रस्त्यावरच ठेवून इतरत्र जातात. यामुळे नगरकीर्तनात मोठा अडथळा निर्माण होतो व धावपळीत चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते. हे अतिक्रमण महापालिका प्रशासनाने कायमचे काढावे व कायमचे सुरक्षारक्षक या मार्गावर नियुक्त करुन अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांचे साहित्य जप्त करावे. जेणेकरुन या मार्गावरील अतिक्रमण कायमचे उठेल व भाविकांना हा मार्ग दर्शनासाठी खुला राहील, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
गुरुद्वारा गेट क्रमांक एक मार्गावर किरकोळ विक्रेत्यांचे अतिक्रमण
By admin | Updated: September 12, 2014 00:06 IST