आळंद : शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण करणे उमरावतीच्या सरपंच तस्लीमबी अक्रम पठाण यांना चांगलेच महागात पडले. त्यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने औरंगाबाद हायकोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवत सरपंच पठाण यांना पदावरून पायउतार केले. सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने या निर्णयामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
उमरावती ग्रामपंचायतीची २०१७ मध्ये निवडणूक झाली होती. यात तस्लीमबी अक्रम पठाण या जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांनी शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण केले असल्याची तक्रारी गावातील सादिक हुसेन पठाण यांनी २२ नोव्हेंबर २०१८ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली हाेती. यात सरपंच तस्लीमबी पठाण, त्यांचे पती अक्रम पठाण आणि सासरे नयनखा पठाण यांनी उमरावती येथील गट क्रमांक ५७६मध्ये अतिक्रमण करून ४८ बाय ६८ फूट अतिक्रमण करून व्यवसायासाठी संबंधित जागेवर पक्के बांधकाम केलेले होते. परंतु, निवडणूक प्रपत्र भरताना ही माहिती त्यांनी लपवत शासनाची फसवणूक केली असून, त्यांचे पद रद्द करण्याची मागणी सादिक पठाण यांनी केली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी फुलंब्री तहसीलदार, आळंद मंडळ आधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे २२ जुलै २०१९ रोजी सरपंच तस्लीमबी पठाण यांना अपात्र घोषित केले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाविरोधात सरपंच पठाण यांनी औरंगाबाद खंडपीठात संबंधित शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण हे माझे सासऱ्यांनी केले असून, त्यांच्याशी माझा व माझ्या पतीचा संबंध नसल्याचा दावा दाखल केला होता. यासह माझे कुटुंब सासऱ्यापासून विभक्त राहत असल्याने त्यांनी केलेल्या अतिक्रमणाशी माझा संबंध नसल्याने मला अपात्र ठरवू नये, असा दावा केला होता. याबाबत सादिक हुसेनखा पठाण यांनी दाखल केलेल्या दाव्यात सरपंच, त्यांचे पती आणि सासरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर रेशन कार्ड वेगवेगळे केले असून, अतिक्रमण केलेल्या जागेवर सरपंच तस्लीमबी पठाण यांचे पती व्यवसाय करीत असल्याचे म्हटले होते. यावर न्यायालयात सुनावणी होऊन ते अतिक्रमण सरपंचाचेच असल्याचे सिद्ध झाल्याने औरंगाबाद हायकोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवत सरपंच तस्लीमबी पठाण यांना अपात्र घोषित केले आहे. न्यायालयात तस्लीमबी पठाण यांच्यातर्फे अमोल चालक तर अर्जदारातर्फे देवदत्त पालोदकर यांनी काम पाहिले.