नांदेड : ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करुन जनतेचे जीवनमान उंचावण्याकरिता राबविण्यात येत असलेल्या कोरडवाहू शेती अभियानांतर्गत मनुष्यबळाचे सक्षमीकरण करण्यात येत असल्याने गावांचा कायापालट झाला आहे.पहिल्या टप्प्यात चार तर दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील दहा गावांची निवड केली आहे. कोरडवाहू शेतीचा विकास करणे अपरिहार्य असल्यामुळे २०१३-१४ पासून राबविण्यात येत असलेल्या अभियानात जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर व मुदखेड ही तीन तालुके वगळता इतर तेरा तालुक्यांतील १४ गावांची निवड केली आहे. यामुळे या गावांची चोहोबाजूंनी प्रगती होत आहे.या योजनेमध्ये दुसऱ्या टप्प्यात लोहा-धानोरा, कंधार-नंदनवन, धर्माबाद-पाटोदा (खु.), हदगाव-ल्याहरी, उमरी-रामखडक, माहूर-कुपटी, बिलोली-हिप्परगामाळ, हिमायतनगर-किरमगाव तर नायगांव तालुक्यातील मुस्तापूर व कोलंबी या गावांची निवड केली आहे. सदरील गावांना शासनस्तरावर मंजुरी मिळाली असून प्रकल्प आराखड्यास मान्यता दिल्यानंतर या गावामध्ये प्रत्यक्ष विकासकामास सुरुवात होईल.पहिल्या टप्प्यात या अभियानंतर्गत मनुष्यबळ विकास करण्यासाठी ९.७० लाखांपैकी ८.४२ लाख खर्च करण्यात आला आहे. यात शेतीशाळा, शेतकरी सहल, शेतकरी गट संघटन आदी कामे करण्यात आली आहेत. संरक्षित सिंचन सुविधेतंर्गत सिमेंटनाला बांध, पाईप पुरवठा, विंधन विद्युतपंप पुरवठा, शेततळी, खोदकाम, सपाटीकरण, ठिबक व तुषार आदी कामे करण्यात आली असून त्यावर २३२.२० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मूलस्थानी जलसंधारणासाठी यांत्रिकीकरण, कोरडवाहू पिकांच्या सुधारित वाणांची प्रात्यक्षिके व मृद तपासणी,नियंत्रित शेती आणि प्राथमिक कृषी प्रक्रिया व पणन, ट्रॅक्टर, रोटावेटर ही कामे केली असून यावर ९.६२ लाख खर्च झाला आहे. प्राथमिक कृषी प्रक्रिया व पणन यातंर्गत मिनी दालमिल, भरडधान्य प्रक्रिया उद्योग, पॅकहाऊस, नियंत्रित शेती, हरितगृह, शेडनेट हाऊस आदी कामे झाली आहेत. यावर ४९.६० लाख खर्च करण्यात आले आहेत.या माध्यमातून कोरडवाहू शेतीची उत्पादकता आणि उत्पन्न वाढवून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे, मूलस्थानी मृदसंधारणासह साखळी बंधारे, शेततळी या माध्यमातून संरक्षित सिंचनाच्या सुविधा निर्माण करणे, सूक्ष्म सिंचन वापरुन सिंचनाची कार्यक्षमता वाढविणे, यांत्रिकीकरणाद्वारे उत्पादन खर्च कमी करुन उत्पादकता वाढविणे, शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी नियंत्रित शेती प्राथमिक कृषी प्रक्रिया व पणन सुविधा निर्माण करणे, कोरडवाहू तंत्रज्ञानाचा पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रचार व प्रसार, प्रशिक्षण, शेतीशाळा, अभ्यासदौरे या माध्यमातून मनुष्यबळाचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. २०१३-१४ या वर्षात अवर्षण प्रवण क्षेत्रातील गावांचा समावेश केला आहे. लाभार्थी निवडतांना अल्प व अत्यल्प भूधारक तसेच महिला व मागासवर्गीय शेतकरी, गटाच्या माध्यमातून गटाधारित शेती करणारे शेतकरी, तसेच जलसंधारणाचा अवलंब करुन सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिलेले आहे. पहिल्या टप्प्यात मुखेड तालुक्यातील ठाणा, भोकर-रिठा, देगलूर-भक्तापूर व किनवट तालुक्यातील जरुर या गावामध्ये आजपर्यंत जवळपास ३.१२ कोटींची कामे करण्यात आली आहेत.
कोरडवाहू अभियानातंर्गत मनुष्यबळाचे सक्षमीकरण
By admin | Updated: August 7, 2014 01:29 IST